मराठवाड्यात अद्यापही पावसाची प्रतीक्षाच; पावसाअभावी पिके आली संकटात
छत्रपती संभाजीनगर : जुलैमध्ये मुसळधार पाऊस झाला होता. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाने अपेक्षेप्रमाणे कमी हजेरी लावली आहे. ऑगस्टमध्ये सलग आठ दिवस विश्रांती घेतल्यानंतर दोन दिवस पावसाने पुन्हा एकदा आपली उपस्थिती दर्शवली. मात्र, सध्या पावसाची गती पुन्हा मंदावली आहे. विभागात ऑगस्ट महिन्यात संभाजीनगर जिल्ह्याने सरासरीदेखील गाठलेली नाही. तर धाराशिव जिल्ह्यात मात्र अपेक्षेपेक्षा अधिकचा पाऊस कोसळला आहे.
पावसाचा अवघा दीड महिना शिल्लक उरला आहे. सप्टेंबरमध्ये पावसाळा संपतो. त्यानंतर परतीच्या पावसाचे वेध लागतात. दरम्यान, सध्या पावसाळा सुरु होऊन जवळपास अडीच महिने होऊन गेले आहेत. या काळात म्हणावा तितका पाऊस झालेला नाही. या काळात काही दिवस जोरदार हजेरी दिल्याने धरणे समाधानकारक भरली गेली आहेत. परंतु, सरासरीच्या तुलनेत पावसाने अपेक्षापूर्ती केलेली नाही.
दरम्यान, जून, जुलै ते १३ ऑगस्टपर्यंत सरासरी ३४१.९ मिमी आहे. मात्र, कोसळलेला पाऊस केवळ ३२५.१ मिमी आहे. म्हणजेच सरासरीच्या तुलनेत केवळ ९५. १ टक्केच पाऊस पडला आहे. अद्याप पावसाळ्याचा दीड महिना शिल्लक आहे. या काळात सरासरी गाठणार का याकडे विशेष करून शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
संभाजीनगरमध्ये सरासरी ६४.५ मिमी पाऊस
१३ ऑगस्टपर्यंत संभाजीनगर जिल्ह्यात महिन्याची सरासरी ६४.५ मिमी होती. याच्या तुलनेत केवळ ३४. ४ मिमी पाऊस झाला आहे. हे सरासरीच्या ५३. ३ टक्के आहे. जिल्ह्यात पेरण्या पूर्ण होऊन कोंबही आले आहेत. आता पिकांच्या वाढीसाठी पावसाची गरज आहे. मध्यंतरी पावसाने दडी दिल्याने शेतकरी चिंतेत झाला होता. मात्र, आठ दिवसांच्या खंडानंतर पुन्हा पाऊस सुरु झाल्याने मिळालेला दिलासा पुन्हा एकदा संपुष्टात असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. शेतकरी आतुरतेने पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
हेदेखील वाचा : स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष उलटली तरी देखील ‘हे’ गाव मूलभूत सुविधापासून वंचित, अखेर वन विभागाने घेतला महत्वाचा निर्णय