फोटो सौजन्य - सोशल मिडीया
गिरणीच्या पट्ट्यात ओढणी अडकल्यानं एका ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. नीतु हर्षल उजवने असं या मृत महिलेचं नाव आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथील आझाद चौकात हर्षल उजवने यांची पिठगिरणी आहे. नीतु हर्षल उजवने या नेहमी प्रमाणे या पिठगिरणीत धान्य दळण्यासाठी आल्या होत्या. मात्र यावेळी काळाने त्यांच्यावर घाला घातला. नीतु हर्षल उजवने धान्य दळत असताना अचानक त्यांची ओढणी गिरणी मशीनच्या पट्यात अडकली. त्यामुळे त्यांच्या गळ्याला फास बसला.
नीतु उजवने यांनी स्वत:ला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांनी लोकांना बोलावण्यासाठी आरडाओरडा देखील केला, पण गिरणीच्या आवाजामुळे नीतु उजवने यांचा आवाज लोकांपर्यंत पोहोचला नाही. अखेर त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर स्थानिकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. नीतु उजवने यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
जालना तालुक्यातील पाणेवाडी शिवारात विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नामदेव जंदे (वय ६०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. गेल्या १५ दिवसांपासून जंदे यांच्या शेतात महावितरणच्या तारा तुटून पडल्या आहेत. याबाबत त्यांनी महावितरणाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. मात्र महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर काल जंदे त्यांच्या शेतात काम करण्यासाठी गेले होते. यावेळी शेतात काम करत असताना अचानक त्यांना विद्युत तारेचा स्पर्श झाला आणि जंदे यांचा जागीच मुत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. जंदे यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.