पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?
पुणे : पुणे जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील ५८ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे काम सीओईपी व खाजगी स्ट्रक्चरल ऑडिट कंपनीला दिले आहे. या दोघांचा अहवाल या ऑक्टोबर महिनाअखेर जिल्हा परिषदेकडे प्राप्त होईल. अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी नवराष्ट्रशी बोलताना दिली.
मावळ तालुक्यातील दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सर्व संबंधित यंत्रणांना जिल्ह्यातील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या यंत्रणांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील पूल, साकव यांची तपासणी करून तसा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे दिला होता. या अहवालात पुणे जिल्हा परिषदेने जिल्हा परिषदेच्या ताब्यात ५८ पुल असल्याचे सांगितले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी डुडी यांनी या सर्व पुलांचे ऑडिट करून धोकादायक पुल पडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेने या पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे काम सीओईपी व खाजगी स्ट्रक्चरल ऑडिट कंपनीला दिले आहे. त्यांचे काम अंतिम टप्प्यात आले असून, या महिना अखेर त्यांचा अहवाल जिल्हा परिषदेकडे सादर होईल.
पुणे जिल्ह्यातील हे सर्वच पुल पाडण्यात येणार नाहीत. या अहवालात नमूद केलेले पुल तात्काळ पाडले जातील. मात्र ज्यांची डागडुजी करावयाची आहे तेही काम नोव्हेंबर महिन्यापासून हाती घेतले जाईल. असेही गजानन पाटील यांनी सांगितले. दरम्यान सार्ववजनिक बांधकाम विभागाकडील ३ पुल धोकादायक असून, ते पाडण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले असले तरी त्याची प्रत्यक्ष कार्यवाही पाऊस पूर्ण उघडल्यावर केली जाणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्त्यारित असलेल्या ३ पुलांपैकी एका पुलाला पर्यायी पुल यापूर्वी बांधून झाला असून, त्यावरून वाहतुकही सुरू झाली आहे. तर दोन पुलांना पर्याय म्हणून नवे पूल बांधण्यात येत आहेत. त्यातील ऑक्टोबर महिनाअखेर तर दुसरा पुल पुढील वर्षी २०२६ मध्ये पूर्ण होणार आहे. त्यानंतरच हे धोकादायक पुल पाडण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरत बाविस्कर यांनी दिली.
हे आहेत तीन पुल