पुढील वर्षी दहावीचे पेपर असणार पोलिस कस्टडीत; पेपरचोरीनंत महत्त्वाचा निर्णय
सिडको / जितेंद्र गिरासे : आयुष्यातील मोठ्या अडचणीसमोर अनेकदा माणूस खचून जातो; पण काही जण संकटालाही संधी मानून पुढे जाण्याचा मार्ग निवडतात. अशीच प्रेरणादायी कहाणी आहे उपेंद्रनगर येथील रुद्रा द प्रॅक्टिकल स्कूलचा दहावीचा विद्यार्थी हर्षल चौधरी याची. गंभीर अपघातानंतरही शिक्षणाची जिद्द न सोडता त्याने थेट रुग्णवाहिकेतून सायन्स-२ चा पेपर देत अनेकांसमोर जिद्दीचा आदर्श ठेवला.
परीक्षेच्या आदल्या दिवशी झालेल्या अपघातात हर्षल गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर उपचार सुरू असल्याने त्याच्यासाठी परीक्षा देणे जवळपास अशक्यच वाटत होते. अशा वेळी अनेक विद्यार्थी परीक्षा पुढे ढकलण्याचा विचार केला असता; मात्र, हर्षलने परिस्थितीसमोर हार न मानता परीक्षा देणारच असा निर्धार केला. मुलाची ही जिद्द पाहून कुटुंबीय आणि शाळेच्या शिक्षकांनीही त्याला पूर्ण पाठिंबा दिला.
विशेष परवानगी घेऊन १३ मार्च रोजी उत्तम नगर येथील जनता विद्यालय केंद्राच्या आवारात रुग्णवाहिकेतच परीक्षा देण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यानुसार हर्षलने रायटरच्या मदतीने सायन्स-२ विषयाचा पेपर शांतपणे पूर्ण केला. उपचार सुरू असतानाही त्याने दाखवलेले धैर्य पाहून उपस्थित सर्वजण भावूक झाले.
या संपूर्ण प्रक्रियेसाठी रुद्रा द प्रॅक्टिकल स्कूलच्या प्राचार्या डॉ. स्मिता चौधरी यांनी पुढाकार घेत नाशिक बोर्डातील श्री देसले आणि परीक्षा केंद्राशी समन्वय साधून आवश्यक परवानगी मिळवली. तसेच अध्यक्ष सुभाष बोरसे, सचिव मोहन देसले, परीक्षा समिती प्रमुख रुपेश आवारे आणि शाखा प्रमुख हेमंत पगारे यांनीही सकारात्मक भूमिका घेत सहकार्य केले. जनता विद्यालयचे केंद्र संचालक अण्णासाहेब ठाकरे, उपकेंद्र संचालक अरुण दातीर व शैलेश देवरे, तसेच सहपरिरक्षक प्रदीप ठाकरे यांनीही विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी आवश्यक मदत केली.
संकटावर मात करण्याची इच्छाशक्ती हवी
या प्रक्रियेत शाळेच्या शिक्षक निवेदिता महाजन, सोनाली कारंडे आणि मृणालिनी गोस्वामी यांनी हर्षलला मानसिक व शैक्षणिक आधार दिला. शाळा प्रशासन व शिक्षकांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेबद्दल हर्षलचे पालक किरण चौधरी यांनी मनापासून आभार व्यक्त केले. उपचारादरम्यान सहकार्य केल्याबद्दल डॉ. अजिंक्य देसले यांचेही त्यांनी विशेष आभार मानले. आजच्या स्पर्धेच्या युगात अनेकदा छोट्या अडचणींमुळे विद्यार्थी निराश होतात. अशावेळी अपघातासारख्या गंभीर प्रसंगानंतरही हार न मानता रुग्णवाहिकेतून परीक्षा देणारा हर्षल चौधरी अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. संकट कितीही मोठे असले तरी जिद्द, इच्छाशक्ती आणि शिक्षणावरील प्रेम असेल तर यशाचा मार्ग नक्की सापडतो, हे हर्षलने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.






