मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यात झालेला पिक विमा घोटाळा प्रकरणाचा तपास ११ पथकाव्दारे नुकताच पुर्ण झाला असून यामध्ये जवळपास ७० टक्के प्रकरणे बोगस असल्याचे तपासात माहिती समोर येत आहे. दरम्यान अंदाजे १५० पानांचा चौकशी अहवाल जिल्हा अधिक्षक कृषी विभागाकडे सादर करण्यात आल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.
जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी होत आहे. मंगळवेढा तालुक्यात द्राक्ष, डाळींब,आंबा व अन्य पिकांचा विमा उतरविण्यात आला होता. दरम्यान या विम्यामध्ये ज्या शेतकऱ्याकडे फळबागाच नाहीत, अशांचाही विमा उतरवुन पैसे लाटण्याचा कुटील डाव उघड झाला आहे. हा घोटाळा चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याने गेल्या तीन आठवड्यापासून ११ पथकाव्दारे त्याची कसून चौकशी करण्यात आली. प्रत्येक पथकामध्ये कंपनीचा एक कर्मचारी, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडल कृषी अधिकारी यांचा समावेश होता.
२ हजार ८७३ शेतकऱ्यांनी पिक विमा भरला होता. यामध्ये जवळपास ७० टक्के प्रकरणे ही बोगस असल्याचे चौकशीत आढळून आल्याचे कृषी विभागाच्या सुत्रांकडून सांगण्यात आले. यामध्ये ४४४ शेतकऱ्यांना कुळ दाखविण्यात आले आहे. या घोटाळ्याचा केंद्रबिंदू सलगर भागात असून येथे कार्यरत असलेल्या सीएससी केंद्रामधून हा सर्व घोटाळा झाल्याची माहिती समोर आली आहे. या केंद्र चालकाने कागदांची पडताळणी करणे अपेक्षित असताना पडताळणी न करता अर्धवट माहितीच्या आधारे फॉर्म भरले असल्याचे व फोटो व्यवस्थित अपलोड केले नसल्याचे चौकशीत समोर आले आहे.
प्रत्यक्ष शेतावर जावून बागेचा अक्षांश-रेखांश फोटो काढणे गरजेचे होते, मात्र तसे झाले नाही. त्यामुळे काही ठिकाणी शेतकर्यांच्या पश्चात हे फॉर्म भरुन घोटाळे केले आहेत. यामध्ये ४४४ शेतकऱ्यांना या प्रकरणाची गुंजभर याची कल्पना नसल्याचे चौकशी दरम्यान सांगण्यात आले. या संपूर्ण चौकशीचा अंदाजे १५० पाने अहवाल दि. २८ रोजी जिल्हा कृषी अधिक्षक यांच्याकडे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. या घोटाळ्यावर विमा कंपनी संबंधीतावर गुन्हे दाखल करणार का? हा महत्वाचा प्रश्न असून या घोटाळ्यात बडे मासेही गळाला लागण्याची शक्यता चौकशीअंती वर्तविली जात आहे.
फळबागा दाखवून फसवणूक
दरम्यान सलगर येथील सीएससी केंद्रावर कारवाई होणेही अपेक्षित आहे. अन्यथा भविष्यात काळ सोकावण्याची शक्यता नाकारता येत नसल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहेत. भीमानदी काठ हा ऊसाचे क्षेत्र म्हणून ओळखला जात असताना तेथेही फळबागा दाखवून विमा लाटण्याचा प्रयत्न काहींना केला गेल्याचे चौकशीमध्ये उघड झाले आहे.
साखळी पद्धतीने गैरव्यवाहार
जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी चौकशीत घोटाळा उघड झाल्यास संबंधीतावर गुन्हे दाखल करण्याचे बैठकी दरम्यान सूचित केले होते. मात्र कंपनी बोगस पिक विमा घोटाळा प्रकरणी गुन्हे दाखल करणार का? की त्यांना पाठीशी घालणार हा महत्वाचा प्रश्न तालुक्यातून सध्या चर्चेला येत आहे. या घोटाळ्यात खालच्या स्तरापासून ते वरिष्ठ स्तरापर्यंत साखळी पद्धतीने हा घोटाळा झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ
काही शेतकऱ्यांनी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याच्या नावाखाली कृषी विभागाकडे अर्ज करुन पोलीसांना पुरावा सादर करण्यासाठी कागदपत्रे कंपनीकडून मागवून घेतली. कृषी खात्याने ती कागदपत्रे देवून आठवडा लोटला अद्यापतरी गुन्हा दाखल न झाल्याने नागरिकांमधून उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.