
Sunil Shelke vs Bala Bhegade in Vadgaon Maval political news
Maval Politics : वडगाव मावळ : सतिश गाडे : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वडगाव मावळमध्ये (Maval News) आज भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमनेसामने आल्याचे चित्र पाहायला मिळाले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोन्ही पक्षांनी शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या दरम्यान निर्माण झालेल्या घोषणाबाजीमुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण तयार झाले.(Sunil Shelke)
राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युतीच्या वतीने आधी भव्य रॅली काढण्यात आली. पंचायत समिती चौकात आयोजित जाहीरसभेत सुनील शेळके यांनी भाजपवर थेट टीकास्त्र सोडले. सभा अंतिम टप्प्यात असतानाच भाजपची रॅली त्याच चौकात दाखल झाली. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. यानंतर भाजपचे कार्यकर्ते थेट तहसील कार्यालयाकडे निघाल्याने परिस्थिती काही काळ तणावपूर्ण बनली.
हे देखील वाचा : शिरूर तालुक्यात उमेदवारीवरून गोंधळ; पक्षाने उमेदवारी नाकारताच नेत्यांनी निवडली अपक्ष उमेदवारी
जनतेने तुम्हाला मतदान का करायचे?’ आमदार शेळकेंचा भाजपला सवाल
या सभेत बोलताना आमदार सुनील शेळके यांनी भाजप नेत्यांवर तीव्र शब्दांत टीका केली. “मावळच्या जनतेने तुम्हाला मतदान का करायचे?” असा थेट सवाल करत त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर भाजपला घेरले. “पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणे हे आमचे ध्येय आहे. तालुक्यातील वाड्या-वस्त्यांपर्यंत विकास पोहोचवण्याची जबाबदारी माझी आहे,” असे आश्वासन त्यांनी दिले. याचवेळी त्यांनी निवडणुकीत जातीपातीचे राजकारण करू नये, असा स्पष्ट इशाराही विरोधकांना दिला.
युतीचा अनुभव आणि भाजपपासून दुरावा
आमदार शेळके म्हणाले की, “राज्यपातळीवर युती असली तरी तालुकास्तरावर संघर्ष निर्माण होत असल्याने नगर परिषद निवडणुकीत युतीचा प्रयत्न केला होता. मात्र त्या निवडणुकीतील अनुभव लक्षात घेता, या वेळी भाजपसोबत युती न करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रमेश साळवे म्हणाले की, “यापूर्वीप्रमाणे यंदाही रिपब्लिकन पक्ष राष्ट्रवादीसोबतच राहील आणि पंचायत समितीवर आपलाच सभापती होईल,” असा विश्वास आहे.
तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी आमदार शेळकेंच्या माध्यमातून तालुक्यात विकासाची दिशा बदलल्याचे सांगत, त्याचा परिणाम या निवडणुकीत मतांच्या रूपाने दिसला पाहिजे, असे आवाहन केले. रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष नारायण भालेराव यांनीही राष्ट्रवादीसोबतची युती कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला.
हे देखील वाचा : पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस–वंचितची अधिकृत आघाडी; भाजपविरोधात एकत्र लढणार
फेब्रुवारीनंतर तुमची ‘टिकटिक’ बंद करतो – बाळा भेगडे
मावळ तालुक्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार सुनील शेळके यांनी भाजपमधील बाळा भेगडे व गणेश भेगडे यांच्यावर “त्यांना भाजपमध्ये कोण विचारतं का?” अशी जोरदार टीका केली होती.
या टीकेला प्रत्युत्तर देताना माजी राज्यमंत्री तथा भाजप नेते बाळा भेगडे यांनी आमदार शेळकेंवर निशाणा साधला आहे. “७ फेब्रुवारीनंतर तुमची ‘टिकटिक’च बंद करायची ताकद दाखवतो. मग मामा-मामा करू नका,” असे म्हणत त्यांनी आमदार शेळकेंवर घणाघात केला. जिल्हा परिषद व पंचायत समिती भाजप-महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करताना झालेल्या सभेत ते बोलत होते. भेगडे पुढे म्हणाले, “अरे, एक प्रशांत घेतला तर एवढे अशांत झाले! ही तर सुरुवात आहे. मावळ पंचायत समिती उभी करण्याचे काम माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लाभले, हे माझे भाग्य आहे.” या पंचायत समितीमध्ये भाजपचाच सभापती बसणार, असा विश्वासही बाळा भेगडे यांनी व्यक्त केला. तसेच “आमदार सुनील शेळके, तुला यापुढे भाजपच्या कोणत्याही नेत्याचा फोन येणार नाही,” असा शब्द देत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. भेगडेंच्या या वक्तव्यामुळे मावळ तालुक्यातील राजकीय वातावरण अधिक तापले असून निवडणुकीच्या तोंडावर आरोप-प्रत्यारोपांची तीव्रता वाढली आहे.