
79 candidates filed nominations for Maval Zilla Parishad and Panchayat Samiti election political news
जिल्हा परिषदेच्या 5 गटांसाठी – इंदोरी-वराळे, सोमाटणे-चांदखेड, खडकाळा-कार्ला, कुसगाव बुद्रुक-काले व टाकवे बुद्रुक-नाणे तसेच पंचायत समितीच्या 10 गणांसाठी – इंदोरी, वराळे, सोमाटणे, चांदखेड, खडकाळा, कार्ला, कुसगाव बुद्रुक, काले, टाकवे बुद्रुक व नाणे अशा एकूण 15 जागांसाठी तब्बल 79 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले तसेच सहाय्यक निवडणूक अधिकारी विक्रम देशमुख यांनी दिली आहे.
हे देखील वाचा : मोठी बातमी ! इलेक्शन ड्युटीला दांडी पडणार महागात; तब्बल 200 जणांची नोकरी संकटात
गुरुवारी (दि. 22) अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू होणार असून, यामध्ये अनेक अपात्र अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. मात्र छाननीपूर्वीच राजकीय पक्षांतील अंतर्गत बंडखोरी उघडपणे समोर आली आहे. 27 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेता येणार असून, त्यानंतरच खरी राजकीय गणिते स्पष्ट होणार आहेत. राजकीय पक्षांनी काही ठिकाणी नवे चेहरे दिले असले तरी बहुतांश ठिकाणी पुन्हा घराणेशाही, नातेसंबंध व आर्थिक ताकद असणाऱ्या उमेदवारांनाच प्राधान्य दिल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून होत आहे.
“निवडणुकीच्या प्रत्येक कामासाठी कार्यकर्ता हवा, मात्र उमेदवारी द्यायची वेळ आली की बाहेरचा पावना शोधला जातो,” अशी तीव्र भावना अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. या नाराजीतून काही ठिकाणी पक्षांतर्गत दबाव तंत्र वापरण्यात आले, तर काही ठिकाणी थेट अपक्ष उमेदवारी दाखल करून नेतृत्वाला आव्हान देण्यात आले आहे. जिल्हा परिषद गटात उमेदवारी न मिळाल्याने अनेक इच्छुकांनी पंचायत समिती गणात नशीब आजमावण्याचा निर्णय घेतल्याने शेवटच्या दिवशी उमेदवारांची अक्षरशः गर्दी झाली. हेच या निवडणुकीचे मोठे वैशिष्ट्य ठरत आहे.
मावळ तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गट व दहा पंचायत समिती गणांसाठी झालेल्या प्रचंड उमेदवारीमुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट चित्र समोर आले आहे.
हे देखील वाचा : घटस्फोटानंतर पुन्हा थाटणार संसार? सत्तेसाठी ठाकरे-भाजप एकत्र येणार? वाचा सविस्तर…
मावळात दोन्ही राष्ट्रवादी स्वबळावर; राज ठाकरेंचा महाविकास आघाडीला पाठिंबा
मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत.
मात्र मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा दिल्यामुळे निवडणुकीत रंगत आणखी वाढली आहे.
महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हा परिषदेसाठी पाच तर पंचायत समितीसाठी नऊ असे एकूण १४ उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले असून, हे सर्व उमेदवार आपापल्या पक्षाच्या अधिकृत निवडणूक चिन्हांवर निवडणूक लढवणार आहेत.
यामुळे मावळात यंदाची निवडणूक थेट त्रिपक्षीय (महायुती – महाविकास आघाडी – अपक्ष/बंडखोर) लढत होण्याची चिन्हे स्पष्ट झाली असून, मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.