हिंजवडीकडे हाय प्रायोरिटीने लक्ष घाला, अन्यथा...; सुप्रिया सुळे यांचा सरकारला इशारा
पिंपरी : हिंजवडी परिसरातील डंपर-ट्रकची बेछूट वाहतूक, आरएमसी प्लांटचा त्रास, रस्त्यावरचा राडारोडा व खड्ड्यांचा प्रश्न तसेच वाढत्या अपघातांमुळे संताप व्यक्त करत खासदार सुळे यांनी सरकारवर थेट हल्लाबोल केला आहे. “मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती करते की, हिंजवडीकडे हाय प्रायोरिटीने लक्ष घालावे. अन्यथा गणपतीनंतर आम्ही नागरिकांसोबत रस्त्यावर उतरून आंदोलन करू,” असा इशारा खासदार सुळे यांनी राज्य सरकारला दिला आहे.
प्रत्यूषाच्या मृत्यूनंतर संतापाचा उद्रेक
१२ ऑगस्ट रोजी हिंजवडी परिसरातील रस्त्यावर डंपरखाली चिरडून प्रत्यूषा संतोष बोराटे (वय ११) या चिमुरडीचा दुर्देवी मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण शहर हादरले. आज (रविवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी मान येथील जॉय व्हिले सोसायटीमध्ये जाऊन बोराटे कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारकडे थेट प्रश्नांची सरबत्ती केली. “हिंजवडीत कोट्यवधी रुपयांचा आंतरराष्ट्रीय व्यवसाय होतो, तरी या भागातील मूलभूत सुविधांचा बोजवारा उडालेला आहे. कंपन्या या ठिकाणाहून परराज्यात जाण्याचा विचार करत आहेत,” असेही सुळे यांनी स्पष्ट केले.
रस्त्यांवर अजूनही राडारोडा, खड्ड्यांचे साम्राज्य
सुळे म्हणाल्या, “पीएमआरडीएने रस्त्यांवरील स्क्रॅप व राडारोडा हटवल्याचा दावा केला, पण प्रत्यक्षात तो अजूनही तसाच आहे. डंपर व आरएमसी ट्रक निर्धारित वेळेनंतरही धावत आहेत. निवासी भागात बेकायदेशीरपणे आरएमसी प्लांट सुरू आहेत. खड्डे अजूनही बुजवलेले नाहीत. त्यामुळे वाहतूक व अपघाताचा प्रश्न गंभीर बनला आहे.”
हिंजवडीचा विकास म्हणजे राज्याचा विकास
“हिंजवडीचा विकास हा केवळ स्थानिक नागरिकांचा प्रश्न नाही, तर राज्याच्या अर्थव्यवस्थेशी जोडलेला महत्त्वाचा मुद्दा आहे. येथे आयटी व इतर क्षेत्रातील कोट्यवधींचा आंतरराष्ट्रीय व्यापार सुरू आहे. तरीही मूलभूत सुविधा मिळत नाहीत, ही खेदजनक बाब आहे. जर ही स्थिती कायम राहिली तर नागरिकांसोबत आम्ही रस्त्यावर उतरणारच,” असा इशारा खासदार सुळे यांनी दिला.