Sanjay Raut alleges that Ravindra Dhangekar left Congress because of allegations against his wife
पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) कित्येक महिने ससून रुग्णालयात मुक्काम टाकून ऐशो आरामात जीवन जगत होता व तेथूनच ड्रग्जचे रॅकेट चालवित असल्याचे उघड झाले. ललित पाटील याला ससून रुग्णालयातील मुक्काम वाढविण्यासाठी डॉ. ठाकूर हे पुढाकार घेत असल्याचे सिध्द झाले आहे. तरीही शासनाने अद्यापपर्यंत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. त्यामुळे ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर (Sanjeev Thakur) यांचे तातडीने निलंबित करावे, अशी मागणी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
धंगेकर म्हणाले, ठाकूर यांच्या पदाच्या समकक्ष पदावरील व्यक्तिच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून शासनाने केवळ हा चौकशीचा फार्स केला आहे. ससून रुग्णालयातील ड्रग्ज रॅकेट उघड झाल्यानंतर आरोपी पाटील याने येथून पलायन केले. यामध्ये पोलिसांना दोषी धरुन त्यांचे निलंबन देखील झाले. मात्र, पाटील याला मदत करणाऱ्या ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकुर यांच्यावर कारवाई करण्यास सरकार चालढकल करत असल्याचे दिसत आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून शासनाने तातडीने डॉ. संजीव ठाकुर यांचे निलंबन करणे आवश्यक आहे.
ठाकुर यांच्या प्रभावामुळे चौकशी समिती निपक्षपणे चौकशी करु शकणार नाही. तसेच ससून रुग्णालयाचे कर्मचारी व अधिकारी देखील ठाकूर यांच्या दबावामुळे त्यांच्या विरोधात जावून कोणतीही माहिती अगर जबाब चौकशी समितीला देणार नाही. त्यामुळे या प्रकरणाची निपक्षपाती चौकशी होण्यासाठी अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकुर यांचे तातडीने निलंबन होणे आवश्यक आहे.