ठाणे/ स्नेहा जाधव,काकडे : ठाण्यात विकासकामांचे तीन तेरा होत असल्याचं पाहायला मिळत आहे. शहरात अतिक्रमण मोठ्या प्रमाणात होत असल्याने आधीच नागरिक त्रस्त आहेत. अशातच आता शहरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे ठाणेकरांच्या नाकी नऊ आले आहेत. विविध ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामातून बाहेर पडणाऱ्या मातीची योग्यरीत्या वाहतूक न झाल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल साचत आहे. विशेषतः कोलशेत रोडसारख्या रहदारीच्या रस्त्यांवर चिखलाचा थर निर्माण झाला असून, त्यामुळे वाहनचालकांचा प्रवास धोकादायक बनला आहे.या समस्येबाबत नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या असूनही प्रशासन मात्र उदासीन आहे. डंपरच्या चाकांमुळे माती रस्त्यावर पसरते, पावसामुळे ती चिखलात रूपांतरित होते आणि दुचाकीस्वारांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. हा प्रकार दररोज दिसत असूनही महापालिकेचे अधिकारी मौन बाळगून आहेत.
या पार्श्वभूमीवर ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. “प्रशासन कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही. अपघात होईपर्यंत वाट बघायची का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांनी ठाणे महापालिकेकडे त्वरित कारवाई करण्याची मागणी केली असून, विकासकांवर दंडात्मक कारवाई केली जावी, अशीही भूमिका मांडली आहे.कोलशेत रोडवर काही विकासकांकडून नियमांचा सर्रास भंग केला जात असून, सार्वजनिक रस्त्यांवर माती, दगड, आणि चिखल पडून रहदारीस अडथळा निर्माण होतो आहे. या प्रकारामुळे रहिवाशांच्या दैनंदिन जीवनात अडथळे येत आहेत. काही ठिकाणी अपघाताचीही शक्यता निर्माण झाली आहे.
ठाणे काँग्रेसने प्रशासनाकडे लक्ष वेधले असून, जर लवकरात लवकर कारवाई झाली नाही, तर आंदोलनाचा इशारा दिला आहे. नागरिकांनीही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून, “विकास चालू असला तरी जनतेच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार?” असा थेट सवाल विचारला जात आहे.