पुणे-सोलापूर रस्त्याच्या चौपदरी कामांना लवकरच होणार सुरुवात (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : पुणे-साेलापूर रस्त्याच्या चार पदरी कामासाठी ‘एमएसआयडीसी’च्या वतीने ६५०० कोटी रुपयांच्या निधीतून निविदा काढण्यात आली आहे. यात हडपसर ऐवजी भैराेबा नाला येथून यवतपर्यंत उड्डाणपुल उभारावा, अशी मागणी विधान परीषद सदस्य याेगेश टिळेकर यांनी केली आहे.
विधान परिषदेत आमदार टिळेकर यांनी पुरवणी मागण्याच्या सत्रात विविध मागण्या केल्या आहे. यामध्ये साेलापूर रस्त्याचे काम राज्य सरकारकडून ४० वर्षानंतर केले जात आहे. या रस्त्यावर हडपसर ते यवत हा १८ किलोमीटरचा उड्डाणपूल प्रस्तावित आहे. हडपसर ऐवजी ताे उड्डाणपुल भैरोबा नाला ते यवत असा २० किलोमीटरचा केल्यामुळे सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल. त्याचा फायदा हा हडपसर, मुंढवा, वानवडी, कोंढवा आदी भागातील वाहतुक कोंडीतून दिलासा मिळेल असा दावा टिळेकर यांनी केला.
हेदेखील वाचा : पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरच मिटणार; हडपसर-उरळी कांचनदरम्यान सहा पदरी उड्डाणपूल होणार
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रस्तावित क्रीडांगण सुरु करण्यास निधी मिळावा, अहिल्यानगर जिल्ह्यातील धर्मवीर गडावर छत्रपती संभाजी महाराजांची भव्य सृष्टी उभी करावी, शहरात महाराष्ट्रातून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता महाज्योतीचे केंद्र पुण्यात सुरु करावे यांसह इतर अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत.
यामध्ये कात्रज-कोंढवा रस्त्यावरील शासनाच्या जागेवर अहिल्यादेवी व सावित्रीबाई या दोन्ही मातांच्या नावाने भव्य सृष्टी उभारावी, खडकवासला, स्वारगेट, हडपसर आणि खराडी या मेट्रोसाठी राज्य सरकारने मान्यता दिली आहे. मात्र, शिवाजीनगर-काेंढवा-येवलेवाडी हा भाग देखील मेट्राे मार्गाने जाेडावा, महंमदवाडी गावाचे नाव बदलून महादेववाडी असे करावे, अशा विविध मागण्या टिळेकर यांनी केल्या आहेत.
तब्बल 25 किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल
दुसरीकडे, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी व वाढते अपघात कमी करण्यासाठी राज्य सरकारने हडपसर-यवत दरम्यान सहा पदरी रस्त्याला नुकतीच मंजुरी दिली. यात हडपसर ते उरळीकांचन दरम्यान तब्बल 25 किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी सुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.