ठाणे, स्नेहा जाधव,काकडे : दिव्यातील फेरीवाले हटवण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. याचपार्श्वभूमीवर आता विरोधी पक्षनेते रोहिदास मुंडे यांनी आंदोलन करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांना टोला लगावला आहे. रोहिदास मुंडे म्हणाले की, भाजपाचे हे आंदोलन अतिशय हास्यास्पद आणि धक्कादायक आहे.
सत्ता हातात असूनही आंदोलन करण्याची वेळ आली आहे, म्हणजेच दिव्यातील भाजपचे स्थानिक पदाधिकारी लोकांची कामे करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत, हे या आंदोलनातून स्पष्ट होते.जनतेसाठी सुविधा पुरवण्याची जबाबदारी ही सत्ताधाऱ्यांचीच असते. मात्र, आज भाजपचेच लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत, म्हणजे त्यांचा कारभार हा केवळ घोषणांपुरताच मर्यादित होता हे उघड होते. स्वतः सत्तेत असूनही समस्या सुटत नसतील, तर ही परिस्थिती सामान्य नागरिकांसाठी अत्यंत निराशाजनक आहे.
यापेक्षा आणखी मोठा विरोधाभास म्हणजे भाजपचा मित्रपक्ष असलेला उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गट या आंदोलनात सहभागीच नाही. यावरून स्पष्ट होते की, भाजपच्या या आंदोलनाला ना लोकसमर्थन आहे, ना घटक पक्षांचा पाठींबा. भाजपचे पदाधिकारी जर काम करू शकत नसतील, तर त्यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकारच नाही. कामे न करता केवळ लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी आंदोलनाचा खेळ खेळणे म्हणजे जनतेची फसवणूक आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी भाजपच्या या आंदोलनाची जोरदार खिल्ली उडवली आहे. “सत्तेत राहून आंदोलन करणं म्हणजे स्वतःचं अपयश झाकण्यासाठी केलेली नाटकी धडपड आहे,” अशी टीका त्यांनी केली आहे. दिव्याच्या जनतेने आता जागरूक होणे आवश्यक आहे. अशा काम न करणाऱ्या, सत्ता असूनही केवळ ढोंगी आंदोलन करणाऱ्या भाजपला भविष्यात निवडून देणे म्हणजे स्वतःच्या विकासाला गालबोट लावणे होय.