ठाणे/स्नेहा जाधव,काकडे : गरजू महिला आणि तृतीय पंथीय व्यक्ती यांना रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी मनपाने महत्वाचं पाऊल उचललं आहे. महापालिका व रोटरी क्लब ऑफ ठाणे लेकसिटी यांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरुपात दोन ई-रिक्षांचे वाटप महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले. या कार्यक्रमास, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त अनघा कदम, रोटरी डिस्ट्रिक्ट 3142 चे माजी गर्व्हनर दिनेश मेहता, रोटरी लेकसिटीच्या अध्यक्षा दिपाली महिंद्रा, रोटेरियन अनिरूध्द आदी उपस्थित होते.
ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महापालिका, रोटरी क्लब ऑफ ठाणे लेकसिटी, एटॉस कंपनी व समर्थ भारत व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याच अंतर्गत, रोटरी क्लब ऑफ ठाणे लेकसिटीतर्फे गरजू आणि स्वयंरोजगाची इच्छा असलेल्या महिला तसेच तृतीय पंथीय यांना रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी ई-रिक्षा ( वीजेवर चालणारी रिक्षा) चे वाटप करण्यात आले. आतापर्यंत एकूण 15 ई-रिक्षांचे वाटप करण्यात आले आहे. त्यापैकी चार ई-रिक्षा तृतीयपंथीयांना देण्यात आल्या आहेत. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या रिक्षाचालकांना शुभेच्छा दिल्या आहेत.