
७ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई, महासभेत कुणाल पाटलांचा प्रशासनाला घेराव
Kalyan Dombivli : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील २७ गावांमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही नागरिकांची पाण्याची समस्या सुटत नसल्याने आता नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. याच मुद्द्यावरून केडीएमसीचे शिवसेना नगरसेवक कुणाल पाटील यांनी महासभेत प्रशासनाला धारेवर धरलं.
२७ गावांमधील अनेक भागांत नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झालं असून पाण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. स्थानिक पातळीवर वारंवार तक्रारी आणि मागण्या करूनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर कुणाल पाटील यांनी महासभेत २७ गावांतील पाणीटंचाईचा मुद्दा जोरदारपणे मांडला. केडीएमसी आणि एमआयडीसीने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
KDMC News: गणेश विसर्जनासाठी १०५ कामांवर ५.२६ कोटींचा खर्च; विसर्जनानंतरच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
केवळ आश्वासनं देऊन हा प्रश्न सुटणार नाही. नागरिकांना नियमित, पुरेसा आणि सुरळीत पाणीपुरवठा कधी सुरू होणार?, असा थेट सवालही उपस्थित करण्यात आला. पाणी हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित मूलभूत प्रश्न असल्याने प्रशासनाने यावर तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याचं कुणाल पाटील यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, २७ गावांमधील पाणीप्रश्नावर केडीएमसी आणि एमआयडीसीकडून ठोस पावलं उचलली जाणार का, याकडे आता नागरिकांचं लक्ष लागलं आहे. तात्पुरत्या उपायांपेक्षा कायमस्वरूपी आणि नियोजनबद्ध पाणीपुरवठा व्यवस्था उभी करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. पाणीटंचाईचा प्रश्न लवकर मार्गी लागला नाही तर येत्या काळात नागरिकांचा संताप आणखी वाढण्याची शक्यता आहे.