
फोटो सौजन्य- गुगल
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात वर्ष २०२५ मध्ये श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या व्यवस्थेसाठी तब्बल कोटी २६ लाख हजार ५६३ रुपये खर्च झाल्याची माहिती माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे. गणेशमूती विसर्जनासाठी उभारण्यात आलेले कृत्रिम हौद, सिंटेक्स टाक्या, फिरते विसर्जन कक्ष तसेच अन्य व्यवस्थांसाठी करण्यात आलेल्या एकूण १०५ कामांवर हा खर्च झाल्याचे माहिती अधिकारातून प्राप्त माहितीत नमूद आहे. हिंदुत्वनिष्ठ तथा दक्ष नागरिक विजय ठाकरे यांनी केडीएमसीकडे माहितीच्या अधिकारात गणेशमूर्ती विसर्जनासाठी उभारण्यात येणाऱ्या कृत्रिम हौदांची संख्या, निविदा, खर्च तसेच विसर्जनानंतर मूतीची विल्हेवाट कशा पद्धतीने लावली जाते, याबाबत माहिती मागवली होती. प्राप्त माहितीनुसार, महानगरपालिका क्षेत्रातील एकूण १० प्रभागांसाठी १० लाख रुपयांपेक्षा कमी रकमेच्या ९८ निविदा, तर १० लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या ७ निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या. अशा एकूण १०५ कामांवर ५ कोटी २६ लाख ३९ हजार ५६३ रुपये खर्च झाल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, विसर्जनानंतर कृत्रिम हौदातील पाण्यावर कोणती प्रक्रिया केली जाते आणि विसर्जित गणेशमूतींची विल्हेवाट कोणत्या पद्धतीने लावली जाते, याबाबतची कार्यपद्धती अभिलेखावर उपलब्ध नसल्याचे माहिती अधिकारातील उत्तरातून समोर आल्याचे ठाकरे यांनी सांगितले. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या विसर्जन व्यवस्थेनंतरची प्रक्रिया नेमकी काय असते, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
“महापालिका गणेशोत्सवात प्रदूषणाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च करते; मात्र विसर्जनानंतर प्राणप्रतिष्ठा केलेल्या गणेशमूर्तीचे काय केले जाते, याची माहितीच उपलब्ध नसणे गंभीर आहे. यामुळे गणेशभक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचे आमचे मत आहे. महापालिकेने विसर्जन व्यवस्थेतील प्रत्येक खर्चाचा हिशोब तसेच विसर्जनानंतरच्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती सार्वजनिक करावी,” अशी मागणी विजय ठाकरे यांनी केली.
महापालिकेकडून प्रदूषण नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असताना वर्षभरातील सांडपाणी व्यवस्थापनाबाबतही प्रशासनाने स्पष्टता द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच या प्रकरणाची प्रदूषण नियंत्रण मंडळाने चौकशी करावी, अशी मागणीही ठाकरे यांनी केली आहे. दरम्यान, माहिती अधिकारातून समोर आलेल्या खर्चाबाबत तसेच विसर्जनानंतरच्या मूर्ती व पाण्याच्या व्यवस्थापनाबाबत केडीएमसी प्रशासनाची अधिकृत भूमिका काय आहे, हे स्पष्ट होणे महत्त्वाचे ठरणार आहे.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)