
Ambedkar Jayanti: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बाजारपेठ गजबजली, भीम अनुयायांचे निळे फेटे, टोपी अन् टी-शर्टने वेधले लक्ष
दरवर्षी 14 एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली जाते. डॉ. भीमराव आंबेडकर हे केवळ संविधानाचे शिल्पकार नव्हते तर ते एक समाजसुधारक, अर्थशास्त्रज्ञ आणि एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते ज्यांनी आपल्याला विचार करण्याचा एक नवीन दृष्टिकोन दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारताच्या संविधानाचे शिल्पकार म्हटलं जातं. आज 14 एप्रिल रोजी संपूर्ण देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जात आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ठाण्यातील बाजारपेठा गजबजल्या आहेत. ठाण्याच्या बाजारपेठेत विक्रीसाठी ठेवलेले निळे कंदील सर्वांचे लक्ष लक्ष वेधून घेत आहेत तर निळे झेंडे, टीशर्ट, टोपी, फेटे यामुळे बाजारपेठेवर निळाई चढली आहे. देशात दरवर्षी 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी केली जाते. यावेळी ठिकठिकाणी सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे मोठ्या उत्साहात आयोजन केले जाते.
हा उत्सव ठाणे शहरात देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा ठाण्याच्या बाजारपेठेतील निळे झेंडे, टीशर्ट, टोपी, फेटे यांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. भीम अनुयायांच्या मागणीनुसार ठाण्यातील आंबेडकर रोड येथे एका महिलेने निळ्या रंगाचे आकर्षक कंदील तयार केले आहेत. या कंदिलांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दीक्षाभूमी यांचे फोटो आणि जय भीम असा मजकूर असून छोटे कंदील 100 रुपये तर मोठे कंदील दिडशे ते तीनशे रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. मागणीनुसार कंदील उपलब्ध करून देऊ, अशी माहिती संध्या कांबळी यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध आकाराचे निळे झेंडे, फेटे, मफलर, टोपी, टी शर्ट बाजारात विक्रीसाठी आले आहेत. निळा झेंडा व डॉ. बाबासाहेबांच्या फोटोंसह झेंडा, डिजिटल प्रिंटचा टीशर्ट हे दिडशे ते दोनशे रुपये तर स्क्रीन प्रिंट हे 70 ते 80 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. बाजारात पांढरा व निळ्या रंगांचे फेटे सुद्धा आले असून निळ्या रंगाच्या फेट्याला व झेंड्याला अधिक मागणी असल्याचे विक्रेते अरविंद साबू यांनी सांगितले.
Ambedkar Jayanti: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त असे द्या भाषण
डॉ. भीमराव आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला. ते एका गरीब कुटूंबात जन्माला आले होते आणि बालपणात त्यांना जातीयवाद आणि भेदभाव या सर्व समस्यांचा सामना करावा लागला, परंतु त्यांनी कधीही हार मानली नाही आणि कठोर संघर्षानंतर उच्च शिक्षण घेतले. त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेतले आणि आपल्या ज्ञानाने जगभर भारताचे नाव उंचावले.
डॉ. आंबेडकरांनी भारतीय समाजात प्रचलित असलेल्या अस्पृश्यता, जातिवाद आणि असमानतेविरुद्ध आवाज उठवला. त्यांनी दुर्बल घटकांना हक्क मिळवून देण्यासाठी अनेक चळवळी सुरू केल्या आणि भारतीय संविधानाच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांचे स्वप्न होते करी, “असा भारत जिथे प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार मिळतील, मग तो कोणत्याही जातीचा, धर्माचा किंवा वर्गाचा असो.”