ठाण्यात एका राजकीय पक्षाच्या सोयीसाठी प्रभाग रचना, जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप (फोटो सौजन्य-X)
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या निवडणूक २०२५ ची प्रभाग रचना करावयाची जबाबदारी महाराष्ट्र शासनाकडे आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अनेक न्याय निवाड्यांमध्ये निकडणूक प्रक्रिया मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक ( Free, Fair and Transperent) असणे आवश्यक आहे. मात्र, ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेमध्ये मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक हि तत्त्व डावलण्यात आले असून एका राजकीय पक्षाच्या सोयीसाठी प्रभाग रचना करून नगरसेवक संख्या चोरी करण्यात आली आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी प्रभाग रचना सुनावणीदरम्यान केला.
ठाणे महापालिका प्रारुप प्रभाग रचनेसंदर्भात दाखल झालेल्या २७० तक्रारींवर आज, बुधवारी ठाणे महापालिका मुख्यालयातील कै नरेंद्र बल्लाळ सभागृहात प्राधिकृत अधिकारी राज्याचे अपर मुख्य सचिव संजय सेठी व ठाणे महानगर पालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत सुनावणी पार पडली. या सुनावणीला उपस्थितीत राहत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभाग रचनेविरोधात आक्षेप नोंदवत गंभीर आरोप केले. प्रभाग रचना २०११ सालच्या जनगणनेच्या आधारावर केली जात आहे असे जाहीर करण्यात आले आहे.
प्रभाग रचनेचा जो मसुदा (Draft) प्रसिध्द करण्यात आला त्यामध्ये प्रभागाची लोकसंख्या दर्शविण्यात आली. मात्र, मसुद्या मध्ये प्रगणक गट यांचे नकाशे आणि प्रती प्रगणक गट लोकसंख्या, त्यातील अनुसुचित जाती व जमातींची लोकसंख्या ही मुलभूत माहिती प्रसिध्द करण्यात आली नाही. यामुळे महापालिकेने प्रसिध्द केलेल्या मसुद्यांमधील (Draft ward Formation) लोकसंख्येचा कोणताही पडताळा घेता आला नाही. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा करुनही सदर माहिती प्राप्त झाली नाही, असा आक्षेप आव्हाड यांनी नोंदवला.
ठाणे महापालिकेच्या प्रभाग रचनेला महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी जोरदार विरोध दर्शविला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट),काँग्रेस आणि मनसे या पक्षांच्या नेत्यांनी प्रभाग रचनेवर गंभीर आक्षेप घेतले असून ही रचना मतदारांच्या सोयीसाठी नसून सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी केली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
यावेळी नेत्यांनी स्पष्टपणे सांगितले की, वार्ड रचना संपूर्ण चुकीची आहे. मतदारसंघ फोडून सत्ताधारी नगरसेवक निवडून येतील अशा पद्धतीने कामकाज करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांची मते व आक्षेप योग्य प्रकारे नोंदवले जावेत यासाठी सुनावणीसाठी आणखी पाच दिवसांचा वेळ वाढवावा, अशी मागणी करण्यात आली. या विरोधात एकत्र आलेल्या नेत्यांमध्ये शिवसेना नेते व माजी खासदार राजन विचारे, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघे तसेच मनसे नेते अविनाश जाधव, सुहास देसाई, रवी मोरे, रोहिदास मुंडे यांचा समावेश होता. प्रभाग रचनेच्या या प्रक्रियेत लोकशाहीची गळचेपी होत असून मतदारांची फसवणूक होत आहे, असा आरोप करत महाविकास आघाडीचे नेते ठाण्यात एकवटले आहेत. यामुळे ठाणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.