
मुंब्र्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते त्यांच्या समर्थकांनी “कोण आया, कोण आया… शेर का शिकारी आया!” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. तसेच सहर शेख यांच्या विधानावर जितेंद्र आव्हाड यांनी पहिल्यांदाच माध्यमांशी बोलताना कडक शब्दांत उत्तर दिले. ते म्हणाले, “लोकांचे काम आव्हान देणे असते, पण आपण त्यांच्या आव्हानांसाठी काम करत नाही. ‘हाथी चले अपनी चाल, कुत्ते भोंके हजार’, आम्हाला काही फरक पडत नाही.”
जितेंद्र आव्हाड यांनी सहर शेख यांचा उल्लेख ‘लहान मुलगी’ असा करत त्यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली. “एखादी लहान पोरगी मिश्किलपणे बोलते, तिचा तो बालिशपणा सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे. तिच्या बोलण्याला फार अर्थ नाही. माझी लहान पोरगी हसत-हसत ‘चॉकलेट लाया’ म्हणाली, तरी ते सोशल मीडियावर गाजेल. हा निव्वळ बालिशपणा आहे,” अशी टीका आव्हाड यांनी केली.
‘मुंब्रा हिरवा होईल’ या विधानाचा समाचार घेताना आव्हाड यांनी संविधानाचा दाखला दिला. ते म्हणाले, “हा देश तिरंगा आहे, हा महाराष्ट्र तिरंगा आहे आणि मुंब्रा देखील तिरंगाच आहे. संविधानाने आपल्याला तिरंगा दिला आहे. या देशात तुम्ही कोणत्याही एका रंगाची ‘मोनोपॉली’ (मक्तेदारी) आणू शकत नाही.”