
फोटो सौजन्य- गुगल
जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाच्या (जेएनपीए) सर्व टर्मिनल्सवर कंटेनर कार्गो हाताळणीत लक्षणीय वाढ झाली असली तरी गेल्या काही दिवसांत निर्माण झालेला वाहतुकीचा तात्पुरता ताण आता पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. बंदरातील सर्व टर्मिनल्सच्या प्रवेशद्वारांवर सध्या कोणतीही वाहतूककोंडी नसून कंटेनर ट्रेलर्सची वाहतूक सुरळीतपणे सुरू असल्याची माहिती जेएनपीएकडून देण्यात आली.
गेल्या काही दिवसांत एकाच वेळी मोठ्या संख्येने कंटेनर जहाजे दाखल झाली. त्याचवेळी १५ हून अधिक जहाजांसाठीचा निर्यात कार्गो एकाच कालावधीत टर्मिनलच्या गेटवर दाखल झाल्याने कार्गोची आवक मोठ्या प्रमाणात एकवटली. शुक्रवार, २ आणि शनिवार, ३ ऑक्टोबर रोजी सप्ताह अखेरीच्या काळात या हालचाली वाढल्याने काही काळ टर्मिनलच्या प्रवेशद्वारांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. परिणामी, कंटेनर ट्रेलर्सच्या ये-जा प्रक्रियेत किरकोळ विलंब झाला.
परिस्थितीची तातडीने दखल घेत जेएनपीए आणि संबंधित टर्मिनल ऑपरेटर्सनी कंटेनर फ्रेट स्टेशन्स तसेच स्थानिक वाहतूक प्राधिकरणांसह समन्वय साधत अतिरिक्त उपाययोजना केल्या. अतिरिक्त मनुष्यबळ आणि साधनसामग्री तैनात करण्याबरोबरच गेट ऑटोमेशनमध्ये सुधारणा करण्यात आली. त्यामुळे वाहतूक कोंडी दूर करण्यात यश आले असून ४ ऑक्टोबरच्या सकाळपासून बंदरातील वाहतूक पूर्वपदावर आली.
बंदरातील यार्डमधील कार्गोचे प्रमाणही वेगाने कमी झाले आहे. २ ऑक्टोबर रोजी यार्डमध्ये सर्वाधिक १,२०,१७३ टीईयू कार्गो होता. त्यावेळी यार्डची क्षमता ६६.८९ टक्के व्यापली होती. त्यानंतर कार्गोची जलद उचल आणि निर्गमन वाढल्याने ६ ऑक्टोबरपर्यंत यार्डमधील कागोंचे प्रमाण ९४,५१९ टीईयूवर आले असून यार्डचा वापर ५२.६१ टक्क्यांवर आला आहे. यामुळे सर्व टर्मिनल्सच्या यार्डमध्ये आता पुरेशी क्षमता उपलब्ध झाली असून कार्गो हाताळणी सुरळीतपणे सुरू आहे.
जेएनपीएतील बंदराचे कामकाज आणि सर्व टर्मिनल्सचे प्रवेशद्वार सध्या सुरळीतपणे कार्यरत आहेत. बंदरातील वाहतुकीवर २४ तास प्रत्यक्ष देखरेख ठेवण्यात येत असून, बंदराकडे येणारे मार्ग तसेच टर्मिनल प्रवेशद्वारांवरील वाहतूक सुरळीत असल्याचे जेएनपीएने स्पष्ट केले आहे. कार्गो वाहतुकीसाठी आवश्यक मार्गांवर कोणताही अडथळा नसल्याचे सांगत जेएनपीएने व्यापार क्षेत्रातील भागधारक आणि वाहतूकदारांना आश्वस्त केले.
जेएनपीएमध्ये वाढलेल्या जहाजांच्या आवकेसोबत कंटेनर कागों हाताळणीतही मोठी वाढ झाली आहे. ४ ऑक्टोबर रोजी दररोजची समुद्री कंटेनर हाताळणी ३५,३०७ टीईयू, तर ५ ऑक्टोबर रोजी ३२,९७२ टीईयू इतकी नोंदवण्यात आली. ही हाताळणी बंदराच्या नियमित दैनंदिन सरासरीपेक्षा लक्षणीय अधिक होती. सप्ताहअखेरीच्या काळात विविध टर्मिनल्सवर १६ ते १७ कंटेनर जहाजे एकाच वेळी कार्यरत होती. २ ऑक्टोबर रोजी २१,७९६ टीईयू म्हणजेच १८,३९१ ट्रक आणि ३ ऑक्टोबर रोजी २०,६८४ टीईयू म्हणजेच १७,५३५ ट्रक इतकी वाहतूक टर्मिनलव्या गेटवरून झाली. त्यानंतर करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे ४ ऑक्टोबर रोजी १९,२९४ टीईयू म्हणजे १६,३३२ ट्रक आणि ५ ऑक्टोबर रोजी १६,९७२ टीईयू म्हणजे १५,०४५ ट्रकची वाहतूक सुरळीतपणे हाताळण्यात आली. या उपाययोजनांमुळे संपूर्ण बंदरातील ट्रकचा सरासरी टर्नअराउंड टाइम कमी होऊन १.४७ तासांवर आला आहे.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)