Kalyan News: कल्याण डोंबिवली मनपाने केलं आरोग्य शिबिराचं आयोजन; फोर्टिस हॉस्पिटलमध्ये कर्करोगाची तपासणी
Kalyan: फोर्टिस हॉस्पिटल, कल्याणद्वारे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (केडीएमसी) सहयोगाने महापालिका कर्मचारी व पत्रकारांसाठी आज एका सर्वसमावेशक कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. लोकांची आरोग्याविषयीची जागरुकता वाढविणे व कर्करोगाचे लवकर निदान होण्याचे महत्त्व अधोरेखित करणे हे या शिबिराचे लक्ष्य होते. केडीएमसीच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये जवळ-जवळ २०५ व्यक्ती (८५ पुरुष व १२० स्त्रिया) सहभागी झाल्या. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त माननीय डॉ. इंदुरीणी जाखड यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
तपासणी शिबिरामध्ये प्राथमिक आरोग्य तपासणी, महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सर तपासणी तसेच स्त्री व पुरुष दोघांसाठीही ओरल कॅन्सरची तपासणी यांचा समावेश होता. फोर्टिस हॉस्पिटल, कल्याणचे असोसिएट सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. हर्षित शाह आणि डॉ. उमा डांगी यांनी या शिबिराचे नेतृत्व केले. तसेच त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे कर्करोग, त्यांची चिन्हे व लक्षणे, आजाराचे लवकर व वेळीच निदान होण्याचे महत्त्व या विषयांची माहितीही दिली. यानंतर उपस्थितांनी या विषयासंबंधी मांडलेल्या शंकांचे त्यांनी निरसन केले.
हे शिबिर जागतिक कर्करोग दिनानिमित्त (४ फेब्रुवारी २०२५) कल्याणच्या बाई रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये डॉ. हर्षित शाह यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे आयोजित करण्यात आलेल्या व सध्या सुरू असलेल्या ओरल कॅन्सर स्क्रिनिंग प्रोग्राम या उपक्रमाला जोडून घेण्यात आले. या कार्यक्रमात तोंडाच्या कर्करोगाची तपासणी करून घेतलेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्यासह २५ व्यक्तींनी सहभाग घेतला व समाजामध्ये कर्करोगाच्या प्रतिबंधाच्या दिशेने आवश्यक असलेल्या अनेक कृतींपैकी पहिली कृती करण्यासाठी पाऊल उचलले.
याप्रसंगी बोलताना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त माननीय डॉ. इंदुराणी जाखड म्हणाल्या, “आमचे कर्मचारी आणि पत्रकार यांच्यासाठीचे हे कर्करोग तपासणी शिबिर त्यांना आपल्या आयुष्याची सूत्रे हातात घेण्यास सक्षम बनविण्याच्या दृष्टीने प्रदीर्घ काळासाठी उपयुक्त ठरणारे आहे, आणि या उपक्रमामुळे इतर जणही आपल्या स्वास्थ्याला प्राधान्य देण्यास प्रोत्साहित होतील, अशी आमची आशा आहे. कर्करोगाचे निदान लवकर होणे कर्करोगाविरोधातील लढाईसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांना एक दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी लागणारे पाठबळ आणि संसाधने पुरविण्याचा आमचा मानस आहे. ”
फोर्टिस हॉस्पिटल, कल्याणचे फॅसिलिटी डिरेक्टर डॉ. मोहित वानखेडे म्हणाले, “हे कर्करोग तपासणी शिबिर फोर्टिसच्या प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला प्राधान्य देण्याचे तत्त्व जपणारे आहे. आपल्या समाजाच्या सुरक्षेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे केडीएमसीचे कर्मचारी आणि पत्रकार यांच्यासाठी आयोजित केलेल्या या शिबिरासाठी केडीएमसीबरोबर सहयोग साधणे ही आमच्यासाठी गौरवाची बाब आहे. कर्करोगाचे वेळीच निदान आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना ही या आजाराचा भार कमी करण्याच्या दृष्टीने काळाची गरज आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने तपासणीची सुविधा सर्वांना सहजतेने उपलब्ध करून देत आम्ही या आजाराचे निदान लवकर होण्याविषयी जागरुकता निर्माण करू शकू, अशी आम्हाला आशा आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्राधान्य देणाऱ्या सार्वजनिक आरोग्य उपक्रमांना पाठिंबा देण्याप्रती आमचे हॉस्पिटल कटिबद्ध आहे आणि अधिक चांगल्या भविष्यासाठी निरोगी जीवनशैलीचे अनुसरण करण्यासाठी आम्ही सर्वांनाच प्रोत्साहन देत असतो.”असं त्यांनी सांगितलं आहे.