
फोटो सौजन्य- pinterest
कोपरखैरणे गावातील नाखवा मच्छी मार्केटमध्ये पिढ्यानपिढ्या मासेविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या स्थानिक आगरी-कोळी महिलांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. गावातील अंतर्गत रस्ते आणि गल्लीबोळांमध्ये फिरून मच्छी विक्री करणाऱ्या अनधिकृत विक्रेत्यांमुळे मार्केटमधील स्थानिक महिलांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. ग्राहक थेट घराजवळच मासे खरेदी करीत असल्याने मार्केटमध्ये येणाऱ्या ग्राहकांची संख्या घटली आहे. परिणामी, दिवसभर बसूनही विक्री होत नसल्याने महिलांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर अनधिकृत फिरत्या मच्छी विक्रेत्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी स्थानिक महिलांनी नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडे केली आहे. कोपरखैरणे गावातील नाखवा मच्छी मार्केटमध्ये अनेक वर्षांपासून स्थानिक आगरी-कोळी महिला मासेविक्रीचा व्यवसाय करीत आहेत. सकाळी आणि संध्याकाळी बाजारात बसून मासे विक्री करून त्या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र, अलीकडच्या काळात गावातील रस्त्यांवर आणि गल्लीबोळांमध्ये फिरून मासे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची संख्या वाढल्याने पारंपरिक बाजारातील व्यवसायावर परिणाम झाला आहे. हे विक्रेते थेट ग्राहकांच्या घरापर्यंत जाऊन मासे विकत असल्याने ग्राहक बाजारात जाणे टाळत आहेत.
मार्केटमधील महिला दररोज पहाटे मोठ्या कष्टाने विविध प्रकारचे मासे खरेदी करून विक्रीसाठी आणतात. मात्र, ग्राहकांची संख्या घटल्याने आणलेला माल विकला जात नाही. परिणामी, शिल्लक राहिलेली मच्छी खराब होऊन महिलांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. आधीच वाढलेला खर्च आणि घटलेली विक्री यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे.
रस्त्यांवर फिरून मासेविक्री करणाऱ्या अनेक विक्रेत्यांकडे अधिकृत परवाने नसल्याचा आरोप स्थानिक महिलांनी केला आहे. त्यामुळे महापालिकेने या विक्रेत्यांची तपासणी करून अनधिकृत विक्रीला आळा घालावा, अशी मागणी करण्यात येत आहे. अधिकृत बाजारपेठेत व्यवसाय करणाऱ्या स्थानिक महिलांना नियमांचे पालन करावे लागत असताना रस्त्यांवरील विक्रेत्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का, असा सवालही महिलांनी उपस्थित केला आहे.
आम्ही वर्षानुवर्षे या मार्केटमध्ये बसून सन्मानाने व्यवसाय करीत आहोत. याच व्यवसायावर आमच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. मात्र, आता रस्तोरस्ती फिरून अनधिकृतपणे मच्छी विक्री करणाऱ्यामुळे आमच्या व्यवसायावर गदा आली आहे. दिवसभर बाजारात बसूनही बोहनी होणे कठीण झाले आहे. त्यामुळे महापालिकेने या विक्रेत्यांवर तातडीने कारवाई करावी. अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा मच्छी विक्रेत्या मुक्ता मुक्ता बाळकृष्ण पाटील यांनी दिला.
या वेळी सुमित्रा संजय पाटील, कल्पना विजय तांडेल, फशुबाई मधुकर पाटील, अस्मिता सूर्यकांत पाटील, सावित्री बळीराम पाटील, लता भगवान पाटील आणि निर्मला दत्तात्रय म्हात्रे यांच्यासह अन्य महिला मच्छी विक्रेत्यांनीही आपल्या व्यथा मांडल्या. स्थानिक महिलांच्या पारंपरिक व्यवसायाचा प्रश्न लक्षात घेऊन नवी मुंबई महापालिका प्रशासन यावर काय भूमिका घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)
Ans: गावातील रस्त्यांवर आणि गल्लीबोळांत फिरून मच्छी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांमुळे स्थानिक महिलांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे.
Ans: अनधिकृत फिरत्या मच्छी विक्रेत्यांची परवान्यांसह तपासणी करून नियमबाह्य विक्रीवर कारवाई करण्याची मागणी महिलांनी केली आहे.
Ans: अनधिकृत विक्रेत्यांवर तातडीने कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महिलांनी दिला आहे.