फोटो सौजन्य- गुगल
हा दगड डेपोमध्ये वापरण्याची मंजुरी नेमकी कुणी दिली, त्याची गुणवत्ता, तांत्रिक तपासणी करण्यात आली आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. एमएमआरडीएकडून मिळालेल्या माहितीनुसार, कशेळी मेट्रो डेपोच्या बांधकामाचे सुमारे ५८९ कोटी ५६ लाख रुपयांचे कंत्राट रित्विक प्रोजेक्टस प्रा. लि या कंपनीला देण्यात आले आहे.
या कंत्राटात रस्ते आणि ड्रेनेजची कामे समाविष्ट आहेत. उपलब्ध प्रकल्प अहवालानुसार मातीकाम आणि खोदकाम यासाठी १२ कोटी ३१ लाख, मातीचा भराव करण्सायासाठी ३५ कोटी ३९ लाख आणि मातीच्या मुख्य भरावावर दगडी वाळूमिश्रित संरक्षक थर टाकण्यासाठी १६ कोटी ६७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
टनेलमधील दगड कशेळी डेपोमध्ये वापरण्याची परवानगी कुणी दिली, आतापर्यंत किती दगड डेपोमध्ये आणण्यात आला, त्याच्या वाहतूक व वापरासाठी किती खर्च झाला, कंत्राटदाराला आतापर्यंत किती रक्कम अदा करण्यात आली, असे विविध सवाल स्थानिक नागरिकांनी एमएमआरडीएला केले आहेत. या प्रश्नांवरील अधिकृत कागदपत्रे आणि तांत्रिक अहवाल सार्वजनिक झाल्यानंतरच टनेलमधील दगडाचा कशेळी डेपोमध्ये केलेला वापर मंजूर निकषांनुसार आहे की नाही, हे स्पष्ट होणार आहे.
एमएमआरडीएच्या माहितीनुसार कशेळी डेपो सुमारे २७ हेक्टर क्षेत्रात विकसित होत असून परिसरातील खाडीतील चिखलमय मातीची परिस्थिती लक्षात घेऊन जमिनीला खचण्यापासून रोखण्यासाठी आणि तिची ताकद वाढवण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो आहे. त्यासाठी आयआयटी मुंबईची मदतही घेण्यात येत आहे. त्यामुळे भरावासाठी वापरण्यात येणाऱ्या दगडाची गुणवत्ता, माती घट्ट बसवण्यासंदर्भात आणि तांत्रिक मान्यता याबाबत पारदर्शक माहिती द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. मात्र, केवळ दगडाचा वापर झाल्याने डेपो असुरक्षित आहे, असा निष्कर्ष काढता येत नाही. त्यासाठी मटेरियल टेस्टिंग, सॉईल इन्व्हेस्टिगेशन, कॉम्पॅक्शन रिपोर्ट्स आणि जिओटेक्निकल सर्टिफिकेशन तपासणे आवश्यक असल्याचे एमएमआरडीएने कळविले आहे.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)






