
हुल्लड डान्सनंतर आता दारू-मटन पार्टीचा आरोप; पालिका कर्मचारी संजय सोनवणेंना नोटीस
३० सप्टेंबर रोजी नवघर जलकुंभ परिसरात विनापरवाना मंडप उभारण्यात आल्याची तक्रार महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली. या मंडपात कर्मचाऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मात्र प्रकरणाला गंभीर वळण त्यावेळी मिळाले, जेव्हा परिसरात मद्याच्या रिकाम्या बाटल्या आढळल्याचा दावा समोर आला.
जलकुंभ परिसर हा पाणीपुरवठ्याशी संबंधित संवेदनशील जागा असताना तेथे अशा प्रकारचा कार्यक्रम झाला तरी प्रशासनाच्या नजरेत तो आला कसा नाही? कार्यक्रमासाठी परवानगी कोणी दिली? मंडप उभारण्याची परवानगी कोणी घेतली? भोजनाची व्यवस्था कोणी केली? कार्यक्रमात नेमके कोण-कोण सहभागी झाले? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मद्याच्या बाटल्या तेथे आल्या कशा? या प्रश्नांची उत्तरे आता महापालिका प्रशासनाला द्यावी लागणार आहेत.
या प्रकरणाची दखल घेत शहर अभियंता दीपक खांबित यांनी ५ ऑक्टोबर रोजी जलकुंभाच्या देखरेखीची जबाबदारी असलेल्या सुनील नामक मिस्त्रीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. अनधिकृतपणे मंडप उभारून कार्यक्रम होऊ दिल्याबाबत खुलासा मागविण्यात आला असून, २४ तासांच्या आत उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, केवळ ‘मंडप उभारला’ एवढ्यावरच हे प्रकरण थांबत नाही. कार्यक्रमात जेवण केलेल्या कर्मचाऱ्यांची यादी सादर करण्याचे निर्देश देण्यात आल्याने या कार्यक्रमात नेमके कोण सहभागी होते, याची माहिती आता प्रशासनाच्या तपासात समोर येण्याची शक्यता आहे. खुलासा समाधानकारक न आल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, महापालिकेतील अधिकारी संजय सोनवणे यांच्याशी संबंधित यापूर्वीचे ‘हुल्लड डान्स’ प्रकरणही चांगलेच गाजले होते. आमदार नरेंद्र मेहता यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातील कथित हुल्लड डान्सचा व्हिडिओ समोर आल्यानंतर या प्रकरणावरून मोठी चर्चा झाली होती आणि संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात आली होती.
आता ‘हुल्लड डान्स’नंतर जलकुंभातील कथित दारू-मटन पार्टीचा आरोप समोर आल्याने महापालिका प्रशासनाच्या शिस्तीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र मद्यपार्टी नेमकी झाली होती का, याबाबत अद्याप अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही. त्यामुळे प्रशासनाची चौकशी आणि संबंधित कर्मचाऱ्याचा खुलासा महत्त्वाचा ठरणार आहे.
शहराला पाणी देणाऱ्या जलकुंभाच्या आवारातच जर विनापरवाना मंडप आणि कथित मद्यपार्टीचे आरोप होत असतील, तर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित होणार का? आता मिरा-भाईंदरकरांचे लक्ष महापालिका प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे लागले आहे.