
बकरी ईदच्या वादानंतर पूनम इस्टेटमध्ये नवरात्रोत्सवावरून नवा वाद; 120 कुटुंबांची परवानगीची मागणी
पूनम इस्टेट क्लस्टर-१मध्ये सुमारे ६२५ सदनिका असून येथे विविध धर्मांचे नागरिक वास्तव्यास आहेत. नवरात्रोत्सवानिमित्त ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान गरबा, दांडिया तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रस्ताव रहिवाशांकडून देण्यात आला होता. कार्यक्रमासाठी सोसायटीच्या सामायिक जागेचा वापर करण्यात येणार होता. आयोजनादरम्यान सोसायटीचे नियम, प्रशासनाच्या सूचना, सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता आणि इतर आवश्यक नियमांचे पालन केले जाईल, असे रहिवाशांकडून सांगण्यात आले होते.
मात्र, २८ सप्टेंबर रोजी झालेल्या सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत अशा प्रकारच्या कार्यक्रमांना परवानगी देऊ नये, असा निर्णय घेण्यात आल्याचे सोसायटीकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवाच्या आयोजनासाठी मागण्यात आलेली परवानगी नाकारण्यात आली. या निर्णयामुळे नवरात्रोत्सव आयोजित करू इच्छिणाऱ्या रहिवाशांनी आक्षेप घेतला असून, मागील वादाच्या पार्श्वभूमीवर सणासुदीच्या कार्यक्रमांवर निर्बंध घालणे योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
याप्रकरणी रहिवासी उमाजांकर नाग यांनी तक्रार केली आहे. सोसायटीचे नियम व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सण साजरे करण्यास रहिवासी तयार असताना एकतर्फी पद्धतीने नवरात्रोत्सवाला परवानगी नाकारणे योग्य नसल्याचा त्यांचा आरोप आहे. सामायिक जागेचा वापर करताना आवश्यक ती शिस्त आणि सुरक्षा पाळण्याची तयारी असतानाही कार्यक्रमाला नकार देण्यात आल्याने रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
या प्रकरणी यापूर्वी ठाणे तालुका उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्याकडेही तक्रार करण्यात आली होती. तक्रारीतील मुद्द्यांवर कायदा आणि सोसायटीच्या उपविधीनुसार योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश उपनिबंधक कार्यालयाकडून सोसायटीला देण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आता नवरात्रोत्सवाच्या आयोजनासंदर्भात पुढील निर्णय काय होतो, याकडे रहिवाशांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, पूनम इस्टेट क्लस्टरमध्ये यापूर्वी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकऱ्या आणून ठेवल्याच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला होता. काही रहिवाशांनी यास आक्षेप घेतल्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. या वादाचे रूपांतर दोन गटांमध्ये हाणामारीत झाल्याने पूनम इस्टेट परिसर चर्चेत आला होता.
या घटनेनंतर मिरा-भाईंदर महापालिकेकडून इमारत परिसरात बकरी पालन आणि कुर्बानीसंदर्भात नियम लागू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे धार्मिक कार्यक्रम, सामायिक जागेचा वापर आणि सोसायटीच्या नियमांबाबत रहिवाशांमध्ये संवेदनशीलता वाढली आहे.
दुसरीकडे, सोसायटी पदाधिकाऱ्यांनी नवरात्रोत्सवाला विरोध करण्यामागे कोणताही धार्मिक हेतू नसल्याचे स्पष्ट केले आहे. सोसायटी कोणत्याही सणाच्या आयोजनाच्या विरोधात नसून, यापूर्वी परिसरात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर २८ सप्टेंबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
सोसायटी पदाधिकारी रूपा पिंटो, दानिश जेक आणि मिनाज डोख यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वसाधारण सभेत घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परिसरातील शांतता, सुरक्षितता आणि भविष्यात कोणताही वाद निर्माण होऊ नये, या दृष्टीने निर्णय घेण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
एकीकडे मागील वादाच्या पार्श्वभूमीवर सोसायटीने सुरक्षेचा आणि शांतता राखण्याचा मुद्दा पुढे केला आहे, तर दुसरीकडे नवरात्रोत्सवासाठी परवानगी मागणारे रहिवासी नियमांचे पालन करण्याची तयारी दर्शवत आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये समन्वय साधून तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे.
नवरात्रोत्सव हा धार्मिक कार्यक्रमासोबतच अनेक कुटुंबांसाठी सामाजिक आणि सांस्कृतिक उत्सव असल्याने त्यासाठी पर्यायी जागा, वेळेचे नियोजन, सुरक्षा व्यवस्था आणि ध्वनीप्रदूषणासंदर्भातील नियम याबाबत प्रशासन व सोसायटीने स्पष्ट भूमिका घेणे आवश्यक असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
आता सर्वसाधारण सभेतील ठराव, सोसायटीचे उपविधी आणि उपनिबंधक कार्यालयाच्या निर्देशांच्या आधारे नवरात्रोत्सवाबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे पूनम इस्टेटमधील रहिवाशांचे लक्ष लागले आहे. मागील वादाची पुनरावृत्ती टाळत सर्व धर्मांच्या नागरिकांना नियमांच्या चौकटीत सण साजरे करण्यासाठी मार्ग काढला जातो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर इर्टिगा कारचा भीषण अपघात; एक ठार, दोन गंभीर जखमी!