राहुल गांधींना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ मुंबईत युवक काँग्रेसचा रास्ता रोको
दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाच्या कार्यालयात भेटीसाठी निघालेले लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि विरोधी पक्षातील अन्य नेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ मुंबईत युवक काँग्रेस आक्रमक झाली. मुंबई युवक काँग्रेसच्या वतीने वांद्रे रिक्लेमेशन येथे रात्री रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं.
मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले. रात्री सुमारे ११ वाजता कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून वाहतूक रोखली. यावेळी मोदी सरकार आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि लोकशाही संस्थांची स्वायत्तता याबाबत युवक काँग्रेसने सवाल उपस्थित केला. राहुल गांधी आणि विरोधी पक्षातील नेत्यांना ताब्यात घेतल्याची घटना म्हणजे लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
या आंदोलनात मुंबई युवक काँग्रेसचे सरचिटणीस तेजस चंदूरकर, जिल्हाध्यक्ष प्रज्ञा ढवळे, अजय मिश्रा, शादाब अन्सारी, शिवा यादव, अब्दुल समद, पंकज चौधरी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना झीनत शबरीन यांनी केंद्रातील आणि विविध राज्यांतील भाजप सरकारांवर गंभीर आरोप केले. ‘व्होट चोरी’च्या मुद्द्यावर देशभरात संताप आहे, असा दावा त्यांनी केला.
राहुल गांधी हे सुमारे ३०० खासदारांसह मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची भेट घेण्यासाठी जात असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा आरोप शबरीन यांनी केला. ही मोदी सरकारची दडपशाही असल्याचं त्या म्हणाल्या.
‘मोदी सरकार जेव्हा-जेव्हा राहुलजींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा-तेव्हा राहुलजींच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरून संघर्ष करू,’ असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, मुंबईतील आंदोलन दडपण्याच्या प्रयत्नात पोलिसांनी महिला युवक काँग्रेस कार्यकर्त्यांशी धक्काबुक्की आणि मारहाण केल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला आहे. काही महिला कार्यकर्त्यांना केसाला धरून ओढत पोलिस व्हॅनमध्ये टाकण्यात आल्याचा दावाही संघटनेने केला.
पोलिसांच्या या कथित दडपशाहीचा मुंबई युवक काँग्रेसने तीव्र निषेध केला असून, निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि लोकशाही संस्थांच्या स्वायत्ततेसाठी आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.
CJP Janatar-Mantar 2.0: चलो दिल्ली…! १० ऑक्टोबरपासून दिल्लीत जंतर मंतर सिझन 2 ; सौरव दास यांचे आवाहन






