माथेरानमध्ये रंगली लाल मातीतली कुस्ती; 9 जिल्ह्यातील कुस्तीपट्टूंचा रणसंग्राम
कर्जत / संतोष पेरणे : लाल मातीची कुस्ती हा महाराष्ट्राचा लोकप्रिय खेळ आहे. माथेरानमध्ये गुढीपाडवा सणाच्या दिवशी लाल मातीवरील कुस्तीची परंपरा आहे.माथेरान ग्रामस्थ मंडळाने आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धेत नऊ जिल्ह्यातील कुस्तीगीर सहभागी झाले होते.सातारा येथील गणेश कोकरे या कुस्तीगीराने अंतिम सामन्यात बाजी मारली. माथेरान मध्ये वसंतोत्सव सुरू असून वसंत पौर्णिमा पासून वस्तोत्सवाला सुरुवात झाली असून माथेरान ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने गुढीपाडवा,श्रीराम नवमी आणि हनुमान जयंती चे सण साजरे केले जातात.
गुढीपाडवा निमित्त येथील हनुमान मंदिराचे समोर असलेल्या मैदानात लाल मातीवरील कुस्ती आयोजित केली जाते.माथेरान ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष प्रकाश सुतार, सचिव चंद्रकांत जाधव, खजिनदार अनंत शेलार,तसेच चंद्रकांत चौधरी कुलदीप जाधव प्रदीप घावरे,किरण जाधव, शिवाजी शिंदे,योगेश जाधव सागर पाटील,संतोष शेलार, विजय चौधरी,चंद्रकांत सुतार,नरेश शिंदे यांचा सहभाग होता तर कुस्ती स्पर्धेचे समालोचक अनिल नाईकडे, मंगेश मोरे यांनी केले.माथेरान मधून शालेय विद्यार्थ्यांनी या कुस्तीत सहभाग नोंदवला.विशेष म्हणजे स्थानिक लहान मुलींनीही सहभाग घेऊन मैदानावर आपला अधिकार गाजवला.कर्जत तालुक्यातील हेदवली येथील पैलवान मुलगी आणि माथेरानमधील पैलवान मुलगी यांच्या लढतीत महिलांसाठी आयोजित करण्यात आलेली विशेष लढत झाली,त्यात हेदवली येथील मुलगी विजयी झाली.
माथेरान मधील लाल मातीच्या कुस्ती स्पर्धेत रायगड, मुंबई,सातारा,सांगली, कोल्हापूर,ठाणे,पुणे,नांदेड,संभाजीनगर तसेच राजस्थान येथून पैलवान मोठ्या प्रमाणात आले होते. लाल मातीवरील कुस्त्या लोप पावत असल्याने माथेरान येथील कुस्ती सामन्यांसाठी राज्याच्या अनेक जिल्ह्यातून कुस्तीगीर यांनी सहभाग घेतला होता.तब्बल नऊ जिल्हे आणि राजस्थान राज्यातील काही कुस्तीगीर यांनी माथेरान मध्ये येऊन कुस्तीचा आनंद घेतला.या स्पर्धेचे अंतिम आणि सर्वात मोठ्या रकमेची कुस्ती सातारा जिल्ह्यातील गणेश कोकरे या पैलवानाने जिंकली.