कांजूर मार्ग ते बदलापूर मेट्रोला हिरवा कंदील, कसा असेल मार्ग? जाणून घ्या (फोटो सौजन्य-X)
मुंबई : मराठी नववर्षानिमित्त बदलापूरकरांसाठी आनंदवार्ता असून, मुंबई आणि बदलापूर ही दोन्ही शहर आता लवकरच मेट्रोने जोडली जाणार आहेत. कारण एमएमआरडीएकडून कांजूरमार्ग ते बदलापूर या मेट्रो १४ च्या ३८ किलोमीटर लांबीच्या मार्गिकेचे काम लवकरच सुरू होणार आहे. यामुळे लवकरच मेट्रो बदलापूरपर्यंत धावणार आहे. या मेट्रोमुळे भविष्यात बदलापूरकरांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे.
साधारण दहा वर्षांपासून चर्चेत असलेल्या कांजूरमार्ग ते बदलापूर या मेट्रो मार्गाला एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात तत्वतः मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता या मेट्रो मार्गाच्या उभारणीला वेग येण्याची चिन्ह दिसत आहेत. मेट्रो १४ च्या मार्गिकेचा पर्यावरण अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्तीसाठी एमएमआरडीएकडून निविदा प्रसिद्ध १५ करण्यात आली असून, एक वर्षात या मेट्रोच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी रविवारी सांगितले.
मेट्रो १४ हा कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो मार्ग ३७.८ किमी लांबीचा आहे. या मार्गावर १५ स्थानके असणार असून, त्यासाठी सुमारे १४ हजार ८९८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. बदलापूरातुन दररोज हजारो चाकरमानी मुंबईला प्रवास करतात. यामुळे बदलापूरपर्यंत मेट्रो यावी अशी मागणी होती. त्यानुसार आमदार किसन कथोरे यांनी यासाठी पाठपुरावा करत दहा वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत मागणी केली होती.
दहा वर्षांत कोणतीही कार्यवाही झाली नाही. मात्र बदलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्यावेळी प्रलंबित असलेल्या मेट्रोच्या मागणीवर कार्यवाही करण्याबाबत आमदार कथोरे यांनी मागणी केली. त्यावर या प्रकल्पाला दिशा दिली जाईल. लवकरात लवकर हे काम मार्गी लावले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार या आठवड्यात मेट्रो मार्गाच्या भूसंपादनाबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले. यामुळे मेट्रो बदलापूरपर्यंत धावण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
उल्हासनगरमध्येही मेट्रो धावणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ही माहिती दिली आहे. ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो-५ मार्गिकेचा विस्तार आता कल्याणऐवजी उल्हासनगर पर्यंत असणार आहे. खडकपाडा ते उल्हासनगर असा मेट्रोचा विस्तार होणार आहे. २०२४-२५ वर्षासाठीच्या अर्थसंकल्पानुसार मेट्रो ५ चा कल्याण-खडकपाडा आणि खडकपाडा-उल्हासनगर अशा ७.७ किमीच्या विस्तारीत मार्गिकेच्या कामासा सुरुवात करण्यात येणार आहे. त्यानुसार अर्थसंकल्पात यासंबंधीची तरतूद करण्यात आली आहे.
लवकरच पहिल्या टप्प्यातील कामाला होणार सुरुवात ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गिका २४.९ किमी लांबीची आणि साडेआठ हजार कोटी खर्चाची मार्गिका आहे. या मार्गिकेवर १७ मेट्रो स्थानके असून ठाण्यापासून मेट्रो सुरू होणार आहे. सुरूवातीच्या आराखड्यानुसार मेट्रो ठाण्याला सुरू होऊन कल्याणपर्यंत धावणार होती. मात्र आता मेट्रोचा विस्तार होऊन येट खडकपाडा ते उल्हासनगर पर्यंत मेट्रो जाणार आहे. लवकरच या मेट्रो मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात होणार आहे.