विसर्जन व्यवस्थेच्या पत्रकातून ‘कोपरी’ गायब!
ठाणे : गणपती बाप्पाच्या आगमनाचा जल्लोष साऱ्या ठाण्यात सुरू असताना ठाणे महानगरपालिकेच्या पर्यावरणपूरक विसर्जन व्यवस्थेच्या पत्रकातून ‘कोपरी’चा उल्लेखच पुसून टाकला गेला!” अधिकृत समितीचं नाव “नौपाडा आणि कोपरी प्रभाग समिती” असतानाही त्या पत्रकातून ‘कोपरी’ हा शब्द पुसून टाकण्यात आला. हा प्रकार उघड होताच कोपरीकरांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी याला “कोपरीच्या अस्तित्वावरच घाला” असे शब्दांत जाहीर निषेध नोंदवला आहे.
कोपरी प्रभाग हा शांत, साध्या आणि संस्कारी जीवनपद्धतीसाठी हा परिसर ओळखला जातो. सुमारे दोन लाख लोकसंख्या असलेल्या या प्रभागाने नेहमीच ठाण्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आयुष्याला आपलं योगदान दिलं. तरी देखील महानगरपालिकेकडून वारंवार दुर्लक्षित केलं जात असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.
पूर्वी स्वतंत्र असलेली कोपरी प्रभाग समिती नौपाडा समितीत विलीन करण्यात आली. लोकांनी विरोध केला तरी त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. अखेर नागरिकांनी तो निर्णय स्वीकारला. पण आता अधिकृत पत्रकातून कोपरीचं नावच नोंदवलं नाही हे पाहून नागरिकांमध्ये रोष उसळला असल्याची माहिती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्ये प्रकाश कोटवाणी यांनी दिली.
कोपरीकरांनी तीव्र नाराजी व्यक्त करताना म्हटलं की, “गणेशोत्सवात आम्हीही पर्यावरणपूरक उपक्रम हिरीरीने राबवतो. विसर्जन घाटांवर शेकडो स्वयंसेवक पालिकेला मदत करतात. मात्र वारंवार आमच्या भागाला दुय्यम स्थान दिलं जातं. हे आम्हाला सहन होणार नाही. ‘कोपरी’ ही केवळ भौगोलिक हद्द नाही, तर आमच्या ओळखीचा अभिमान आहे. पत्रक तात्काळ दुरुस्त करून कोपरीचा मान परत मिळवून द्यावा अशी मागणी जोर धरते आहे. या संदर्भात महापालिकेशी संपर्क साधला असता, एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की त्वरीत पत्रकातील त्रुटी दूर केली जाईल.
कोपरीत गणेशोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहतो. सर्वात शांत प्रभाग अशी ओळख कोपरीची आहे. इथे इतिहास, परंपरा आणि सांस्कृतिक ओळख असलेलं कोपरीचं नावच गाळणं हा थेट आमच्या अस्तित्वाचा अपमान आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्ये कोपरी ठाणे पूर्व प्रकाश कोटवाणी यांनी दिली.