अंबरनाथ : वांगणीत बांबू लागवडीला चालना देण्यासाठी भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ज्ञानेश्वर हॉल येथे मंगळवारी (ता.२७) रोजी बांबू लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी हा भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कृषी मूल्य आयोगाचे मंत्री दर्जा प्राप्त पाशा पटेल यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारना यांनी आपल्या भाषणात आदिवासी शेतकऱ्यांना वनपट्टयांमध्ये बांबू लागवड करण्याचे आवाहन केले. तसेच पाशा पटेल (मंत्री दर्जा) यांनी आपल्या सखोल मार्गदर्शनात पर्यावरणातील बदल, कार्बन उत्सर्जनाचे दुष्परिणाम आणि बांबू लागवडीचे महत्त्व यावर प्रकाश टाकला. सन १७६५ मध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीपासून वातावरणात कार्बनचे प्रमाण वाढले असून वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. त्यांनी उदाहरण देत सांगितले की, मे २०२५ मध्ये १०० वर्षात पहिल्यांदाच मुंबईमध्ये २०० मि.ली. पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. २०२४ मध्ये कार्बनडायऑक्साइडचे प्रमाण ४२७ पीपीएम होते आणि ते २०५० पर्यंत ४५० पीपीएमपर्यंत पोहोचू शकते, यामुळे मानवजातीला जगणे कठीण होईल, असा इशारा त्यांनी दिला.
बांबू ही झाडे कार्बनडायऑक्साइड शोषून घेतात व ऑक्सिजन वातावरणात सोडतात. याशिवाय, बांबूपासून इथेनॉल निर्मिती करता येते. सध्या भारत सरकार आसाम राज्यात इथेनॉल निर्मितीचा कारखाना उभारत आहे. याशिवाय, बांबूपासून चष्मे, टॉवेल, टी-शर्ट, पेन, घड्याळ यांसारख्या विविध वस्तू तयार करता येतात. या वस्तूंचे प्रदर्शनही मेळाव्यात करण्यात आले होते.
गट विकास अधिकारी पंडित राठोड यांनी यावेळी माहिती दिली की, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना रु. ७,०४,६४५/- इतके अनुदान चार वर्षांच्या कालावधीत मिळू शकते. शेतकऱ्यांनी यासाठी तालुका कृषी अधिकारी, वन विभाग, पंचायत समिती किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांमध्ये अंबरनाथ तहसीलदार अमित पुरी, गट विकास अधिकारी पंडित राठोड, श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारना, सरचिटणीस बाळाराम भोईर, जिल्हाध्यक्ष अशोक सापटे, परीक्षेत्र वन अधिकारी संजय धारावणे, तालुका कृषी अधिकारी सिद्धार्थ क्षीरसागर, वांगणी सरपंच वनिता आढाव, तसेच तालुक्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी, कृषी सहाय्यक, वन विभागाचे अधिकारी व इतर प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.