कर्जत/ संतोष पेरणे : तालुक्यातील उल्हास नदीला रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे महापूर आला आहे.नेरळ कळंब रस्त्यावरील दहीवली पुलावरून पहाटेच्या वेळी पाणी जाऊ लागल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती.दुपारी बारा वाजता नदी मधील पाणी ओसरल्यानंतर पोलिसांनी हा पुल वाहनांसाठी पुन्हा खुला केला आहे.दरम्यान या पुलाच्या निर्मितीनंतर ४५-५० वर्षात पहिल्यांदा मे महिन्यात उल्हास नदीला पूर आला आहे. या कमी उंचीच्या पुलाच्या बाजूला अधिक उंचीचा पुल बांधला जात असून पुलाच्या कामासाठी आणलेले क्रेन आणि जनरेटर हे महापुराच्या पाण्यात वाहून जाण्याची घटना घडली आहे.
Mansoon Update : पावसाचा कहर, उल्हास नदीच्या पाणीपातळीत वाढ; अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ आला समोर
खंडाळा येथील बोरघाट आणि कर्जत तालुक्याचे सीमेवर उगम पावणारी उल्हास नदीला आज पहाटे महापूर आला. काल पासून सुरू असलेला संततधार पाऊस आणि रात्री झालेली ढग फुटी यामुळे उल्हास नदीला पूर आला.या पुरामुळे कोंढाणे गावाजवळ असलेला चोची गावाकडे जाण्यासाठी असलेला लहान पुल पाण्याखाली गेला.त्यानंतर बीड गावाकडे जाण्यासाठी असलेला मोहिली पुल देखील पाण्याखाली गेला असून कर्जत शहरातील दोन भाग जोडणारा दहिवळी पायपुल हा देखील पाण्याखाली गेला होता.हे सर्व पुल आजची सकाळ होण्याआधी पाण्याखाली गेले होते.या उल्हास नदीवरील सर्वात महत्वाचा आणि साधारण ३०-४० गावांचा संपर्क असणारा माथेरान नेरळ कळंब राज्यमार्ग रस्त्यावरील दहीवली पुल हा पाण्याखाली गेला.पहाटेपासून या पुलावरून पाणी जाऊ लागल्याने या पुलावरून होणारी वाहतूक कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मालेगाव आणि दहीवली ग्रामस्थांनी बंद केली होती.
मालेगाव दहिवली पुलावरून साधारण बारा वाजेपर्यंत महापुराच पाणी जात होते.त्यामुळे पोलिसांना त्या पुलाच्या पलीकडील भागात जाण्यासाठी उल्हास नदीवरील तळवडे पुलाचा वापर करावा लागला.दुपार बारा वाजता नेरळ पोलीस ठाणे यांचे अधिकारी यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल विभागाशी संपर्क करून पाणी ओसरल्याची माहिती दिल्यानंतर पुलावरून वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला.तहसीलदार डॉ धनंजय जाधव आणि पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या समन्वय तून पुल वाहतुकीस खुला झाला.उल्हास नदीवरील दाहीवली मालेगाव येथील पुल कमी उंचीचा असून दरवर्षी पावसाळयात चार ते पाच वेळा उल्हास नदीला महापूर आल्यानंतर पुलावरून पाणी जाते आणि त्यानंतर वाहतूक बंद होते.मात्र यावर्षी मे महिन्यात उल्हास नदीला पूर आला असून दहिवली मालेगाव पुलाची निर्मिती झाल्यानंतर पहिल्यांदा उल्हास नदीला पूर आला आहे.
पुलाच्या बांधकामाचे साहित्य गेले वाहून..
नेरळ कळंब रस्त्यावर दहीवलि मालेगाव येथे उल्हास नदीवर सध्या वापरात असलेला पुल हा कमी उंचीचा आहे.त्यामुळे त्या पुलावरून दरवर्षी महापूर आल्यानंतर पाणी जाते.परिणामी तेथे जास्त उंचीचा नवीन पुल बांधण्यात यावा अशी मागणी होती.त्यानुसार २५ कोटी रुपये खर्चून अधिक उंचीचा पुल बांधण्यात येत आहे.त्या पुलाच्या कामासाठी आणलेले साहित्य अचानक झालेल्या ढग सदृश पावसामुळे आणि उल्हास नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेले आहे.त्यात पुलाच्या कामासाठी आणलेले लोखंडी क्रेन आणि जनरेटर देखील वाहून गेले असल्याची माहिती बांधकाम खात्याकडून देण्यात आली आहे.