ठाणे, स्नेहा जाधव, काकडे: कळवा प्रभाग समिती अंतर्गत साईनाथ नगर येथे नाल्याची सफाई करण्यात आली. त्यानंतर मागील दहा दिवसापासून या नाल्यातील गाळाचा भला मोठा ढीग तसाच नाल्याच्या बाजूला रस्त्यावर पडून आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने दुषित पाणी पसरून परिसरात दुर्गंधी पसरली असून वाहनांच्या वर्दळीमुळे गाळ इतरत्र पसरत आहे. याचा त्रास नागरिकांना होत असून हा गाळ तातडीने उचलावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.
नाल्यातील गाळामध्ये अनेक घातक रसायने आणि जंतू असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे .नाल्यातील निघालेल्या गाळावर जंतुनाशक व दुर्गंधीनाशकाचे फवारणी करणे बंधनकारक असताना देखील अशी कुठल्याही प्रकारची फवारणी करण्यात आलेली नव्हती.तसेच नियमानुसार नाल्यातून काढलेला गाळ ४८ तास ठेऊन त्यानंतर तातडीने सक्षम अधिकाऱ्यांनी निर्देशित केलेल्या जागेवर विल्हेवाट न लावल्यास अशा चुकीच्या असमाधानकारक कामासाठी दंडात्मक कार्यवाहीची तरतूद असताना देखील संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत ठेकेदारास पाठीशी घालत असल्याचा आरोप काँग्रेस चे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी केला आहे.
कळवा येथे रहदारीच्या रस्त्यावर रचून ठेवलेल्या भल्या मोठ्या गाळाच्या ढिगार्यामुळे दुचाकी वाहने घसरून होत असलेले लहान मोठे अपघात,तसेच सुकलेल्या गाळाच्या ढिगावर लहान मुले चढल्यास विद्युत वाहक तारांना स्पर्श झाल्यास होणारी दुर्घटना, नालेसफाई दरम्यान पिण्याच्या पाण्याचे तोडलेले पाईप,काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांना हँन्ड ग्लोज, गमबुट सह इतर सुरक्षा उपकरणाचा अभाव या गोष्टीचे गांभीर्य कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त व मुख्य स्वच्छता निरीक्षक यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी मी सदर ठिकाणी भेट द्यायला येते असे मुख्य स्वच्छता निरीक्षक यांनी सांगितले परंतु प्रत्यक्षात मात्र चार तास वाट बघून देखील न येता इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाठवत स्वतःहा मात्र पळ काढला.आलेले कर्मचारी आम्ही लगेच गाळ उचलून घेतो याव्यतिरिक्त नालेसफाई बाबतच्या कुठल्याही प्रश्नांची समर्पक उत्तरे देऊ शकले नाहीत.
त्यामुळे इथून पुढे प्रशासनाच्या माध्यमातून ठाणे शहरात नालेसफाई दरम्यान जर चुकीचे काम करत हातसफाई करण्याचा प्रयत्न झाला तर काँग्रेस च्या माध्यमातून आंदोलनात्मक भूमिका घेतली जाईल असा इशारा काँग्रेस चे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी दिला आहे.यावेळी कळवा ब्लॉक अध्यक्ष राजू शेट्टी, सेवादल अध्यक्ष रवींद्र कोळी मुंब्रा ब्लॉक अध्यक्ष निलेश पाटील, कळवा ब्लॉक कार्याध्यक्ष नूर्शिद शेख व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.नालेसफाईच्या कामातील अटी शर्ती आणि कर्तव्य जबाबदाऱ्या घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांनाच माहित नसतील तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. आम्ही लवकरच याबाबत आयुक्तांची भेट घेणार आहोत असे राहुल पिंगळे यांनी सांगितले.