दिवाळीत जाणवणार थंडीचा कडाका; दिवसा उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता
मुंबई : यंदाच्या वर्षी भरपूर पाऊस झाल्याने आतापासूनच थंडी जाणवू लागली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत थंडीचा कडाका जाणवणार असून, दुपारच्या वेळेला कडक उन आणि रात्री थंडीची सुरुवात होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. वातावरणातील हा बदल बुधवार (दि. १५) नंतर होईल, असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. त्यामुळे दिवाळीच्या वेळेस थंडी वाढण्याची शक्यता आहे.
परतीचा मॉन्सून यंदा ६ सप्टेंबरला राजस्थानातून निघाला. मात्र, तो सुमारे महिनाभर गुजरातमध्ये अडखळून बसला होता. गुरुवारी (दि.९) पासून पाऊस गुजरातमधून महाराष्ट्रात येण्यास वातावरण अनुकूल झाले असून, तो २४ तासांत राज्यात येऊन बुधवारी (दि. १५) पर्यंत न बरसताच दक्षिण भारताकडे प्रस्थान ठेवणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे यंदा ऐन दिवाळीत कडाक्याची थंडी अनुभवायला मिळू शकते. परतीचा मॉन्सून गुजरातच्या वेरावलपर्यंत पोहोचला आहे. आगामी २४ तासांत महाराष्ट्रात येईल व राज्यासह देशातून बुधवारपर्यंत माघारी जाईल.
हेदेखील वाचा : यंदाच्या दिवाळीमध्ये महाराष्ट्रातील ‘या’ हिल स्टेशनला नक्की द्या भेट, निसर्गरम्य ठिकाण पाहून मन होईल आनंदी
अरबी समुद्रातील वादळ तसेच बंगालच्या उपसागरातील हवामान घटकांमुळे परतीच्या मॉन्सूनला ब्रेक लागला होता. मात्र, आता यासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. २४ तासांत उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांतून मॉन्सून परत फिरणार आहे. तसेच आगामी आठवड्यांतच मान्सून देशातून निरोप घेणार असून, ईशान्य मोसमी पाऊस दक्षिण भारतात सुरू होईल.
तापमानात घट होण्याचा अंदाज
दक्षिण भारत वगळता देशभरातील किमान तापमानात सरासरीपेक्षा १ ते ३ अंश सेल्सिअसने घट होईल. तसेच कमाल तापमानदेखील सरासरीच्या कमी राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
ला निनाचा बसणार फटका
भारतात मान्सून हंगाम नुकताच संपला आहे. पावसाळ्याचा निरोप घेतल्यानंतर आता लोकांचे लक्ष हिवाळ्याकडे वळले आहे. मात्र, या वर्षीचा हिवाळा काहीसा वेगळा आणि अधिक कडक ठरणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. यामागील मोठे कारण आहे “ला निना” नावाची हवामान बदल.
हेदेखील वाचा : La Nina च्या पुनरागमनाने खळबळ; मुसळधार पावसानंतर आता थंडी दाखवणार रौद्र रूप, हवामानशास्त्रज्ञांचा इशारा