मराठी मनाला दिलासा! ठाकरे बंधूंचे पुणेकरांकडून स्वागत; सर्वसामान्यांच्या प्रतिक्रीया वाचा सविस्तर
पुणे : मुंबईत नुकतीच पार पडलेली मराठी विजय रॅली ही फक्त मुंबईपुरती मर्यादित न राहता तिचा प्रभाव संपूर्ण महाराष्ट्रभर उमटताना दिसत आहे. विशेषतः पुण्यातील नागरिकांमध्ये या ऐतिहासिक एकजुटीचा सकारात्मक सूर उमटत असून मराठीसाठी एकत्र आलेल्या राज आणि उद्धव ठाकरे यांचे स्वागत होत आहे.
राज्य सरकारच्या त्रिभाषा धोरणात हिंदी भाषा सक्तीची अट घालण्यात आल्याने निर्माण झालेल्या अस्वस्थतेला अखेर मूळ मराठी आवाजामुळे मार्ग मिळाला असे चित्र पुणेकरांच्या प्रतिक्रियांमधून दिसून आले. सरकारने हा निर्णय मागे घेतल्यामुळे मराठी भाषेचा, संस्कृतीचा आणि अस्मितेचा सन्मान झाल्याचा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.
पुण्यातील शिक्षक वर्ग, विद्यार्थी, पालक, तरुण कार्यकर्ते आणि साहित्यिक मंडळींकडून या रॅलीचे विशेष कौतुक होत आहे त्यांच्या मते एकजूट केवळ भाषेसाठी नव्हे तर मराठी अस्मितेच्या नव्या चळवळीचा प्रारंभ आहे. पक्षविहीन आणि महाराष्ट्र झेंडा खाली एकत्र आलेली ही शक्ती आगामी काळात अनेक नवे संदर्भ निर्माण करू शकते असे प्रतिक्रियांमधून व्यक्त होत आहे. वरळीतील एन एस सी आय डोममध्ये 30000 पेक्षा अधिक मराठी जणांची उपस्थिती आणि कोणताही पक्षाचा झेंडा नसलेल्या या रॅलीतील केवळ मराठी अभिमानाचा आवाज पुण्याच्या मराठी माणसाला स्फूर्ती देणारा ठरला आहे.
1)आज फक्त उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आलेले नसून एक कुटूंब एकत्र आलेले आहे. शिवसेना आणि मनसे या दोन वेगळ्या चुली जरी दिसत असल्या तरीही आमच्या डोक्यावरील बाळासाहेब ठाकरे नावाचं छप्पर एकच आहे. कित्येक वर्षांची प्रतीक्षा आज संपली आहे. मराठी माणूस एकत्र आल्यामुळे आज आमच्यासाठी हा दिवाळी सणासारखा दिवस आहे.
– नीरज नांगरे, स्थानिक नागरिक
2) हा मेळावा जरी भाषेसाठी होता, तरी मराठी माणसाच्या एकतेचा हा विजयी मेळावा होता, हे नक्की. एक गोष्ट मात्र पक्की कळली, आता पुढे फक्त आवाज उठवणारच नाहीत, तर तो खणखणीतपणे काढलाही जाईल.
– सुजान बाळू दबडे
3) “राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे मराठी भाषेला पुन्हा प्रतिष्ठा मिळाली आहे. ही रॅली केवळ आंदोलन नव्हे, तर मराठी अस्मितेसाठी एक मोठा टप्पा ठरला. सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेणं हे जनशक्तीचं यश आहे.
– नवनाथ भगत.
4) “शिवसेना आणि मनसे एकत्र येणं हे काळाची गरज होती. मराठीसाठी जेव्हा राजकारण बाजूला ठेवून नेतृत्त्व एकत्र येतं, तेव्हा समाजात आशा निर्माण होते. ही रॅली मराठी जनतेच्या मनात नवचैतन्य घेऊन आली.”
– कमला गड्डीलू, महिला व्यावसायिक
5) “मराठी भाषेला बाजूला सारणाऱ्या धोरणांवर रोष होता. ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन मराठीचा आवाज बुलंद केला हे कौतुकास्पद आहे. अशा प्रकारची एकजूट सतत राहायला हवी.”
– प्रतीक झेंडे, महाविद्यालयीन विद्यार्थी
6) “हिंदी सक्तीमुळे मुलांवर अतिरिक्त ताण येत होता. आता सरकारनं तो निर्णय मागे घेतल्यानं पालक म्हणून समाधान वाटतं. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने मराठी पालकांच्या भावना ऐकल्या गेल्या.”
– सारिका बोने, स्थानिक नागरिक पालक
7) “‘मराठी विजय रॅली’मुळे भाषेची केवळ भावना नाही तर कृतीदेखील स्पष्ट झाली. पक्षविहीन रॅलीत मराठी माणसाने एकत्र येऊन ताकद दाखवली, हे अभिमानास्पद आहे.”
– रोहित तळेकर
8) “मराठी अस्मितेसाठी ठाकरे बंधूंची ही जोडी प्रेरणादायी आहे. त्यांच्या एकजुटीमुळे नव्या पिढीला भाषेचा अभिमान वाटेल आणि ती टिकवण्याची उमेद निर्माण होईल.”
– ऋषी परब, स्थानिक नागरिक
9) “माझ्यासारख्या तरुणाला वाटत होतं की, भाषेसाठी कोणी लढणारच नाही, पण या रॅलीनं दृष्टिकोन बदलला. हे केवळ भाषेचं नव्हे, तर स्वाभिमानाचं आंदोलन आहे.”
– शलील महाराज जगताप, स्थानिक नागरिक
10) “राजकीय मतभेद बाजूला ठेवून जेव्हा नेते एकत्र येतात, तेव्हा समाज घडतो. मराठी भाषेसाठी अशीच निस्वार्थ एकजूट कायम राहिली, तर महाराष्ट्र कुणासमोर झुकणार नाही.”
–जयेंद्र निकम, स्थानिक नागरिक