पोषण आहार आधी मुख्याध्यापक अन् शिक्षक खाणार, मगच विद्यार्थ्यांना देणार; विषबाधा टाळण्यासाठी नवा नियम
पुणे : राज्यातील शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारे परिणाम रोखण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने नवे नियम लागू केले आहेत. यापुढे विद्यार्थ्यांना अन्न देण्याआधी मुख्याध्यापक, शिक्षक यांनी त्या आहाराची चव घेणे आणि दर्जा तपासणे अनिवार्य करण्यात आले आहे. याबाबतची मानक कार्यपद्धती (एसओपी) जाहीर करण्यात आली आहे. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेसाठी आता अधिक दक्षता घेतली जाणार आहे.
स्वच्छता आणि दर्जा
भोजन तयार झाल्यानंतर अर्धा तास आधी शिक्षक, मुख्याध्यापक, स्वयंपाकी यांनी चव घेणे अनिवार्य, चव आणि दर्जाविषयी अभिप्राय नोंदवहीत नोंदवणे बंधनकारक, जेवणाचे नमुने हवाबंद डब्यात २४ तास ठेवणे आवश्यक, अन्नधान्य आणि साहित्य एक वर्ष मुदतीचे असणे आवश्यक आणि स्वच्छ हात आणि साबण-पाण्याची उपलब्धता बंधनकारक करण्यात आले.
उल्लंघन केल्यास कठोर कारवाई
कोणत्याही प्रकारची विषबाधा झाल्यास आणि प्रयोगशाळा तपासणीत दोष आढळल्यास संबंधित पुरवठादारावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे. शिक्षण अधिकारी दरमहा पुरवठादार गोदामांची पाहणी करणार असून, तालुका पातळीवर दर महिन्याला किमान दोन शाळांतील भोजन नमुने तपासले जाणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी व्यापक जबाबदाऱ्या
शाळा व्यवस्थापन समितीने धान्याचा दर्जा तपासूनच स्वीकृती द्यावी, तसेच जेवणानंतर कोणत्याही विद्यार्थ्याला त्रास झाल्यास आरोग्य केंद्राशी तत्काळ संपर्क साधावा, असेही आदेश देण्यात आले आहेत. या नव्या नियमांमुळे शालेय भोजन अधिक सुरक्षित होणार असून, शिक्षकांची भूमिका केवळ अध्यापनापुरती मर्यादित न राहता, आता विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या देखरेखीपर्यंत विस्तारली जाणार आहे.
शालेय पोषण आहारामुळे विद्यार्थ्यांना विषबाधा
शालेय पोषण आहार खाल्ल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे प्रकार अनेक उघडकीस आले आहेत. गेल्या काही महिन्याखाली सांगलीच्या विटा येथील शासकीय निवासी शाळेतल्या 23 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली होती. रविवारी रात्रीच्या सुमारास मुलांना देण्यात आलेल्या जेवणातून ही विषबाधा झाली होती. मुलांना मळमळ, जुलाब, पोटदुखी आणि अस्वस्थ वाटू लागल्यानंतर तातडीनं त्यांना विट्याच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. समाजकल्याण विभागाच्या विटा येथील शासकीय निवासी शाळेमध्ये हा विषबाधेचा प्रकार घडला होता. रात्री मुलांना मटणाचं जेवण देण्यात आलं होतं. त्यामुळं या जेवणातून विषबाधा झाली होती. एकाचवेळी 23 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यानं खळबळ उडाली होती. अशा घटना अनेक भागात घडल्या आहेत. विषबाधेच्या घटना रोखण्यासाठी शिक्षण विभागाने नवा नियम जाहीर केला आहे.