आंबेगाव : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागात मीना नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातील पाणीसाठा संपल्याने शेतीपिकांना ताण बसू लागला आहे. परिणामी, आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
रांजणी, वळती, नागापूर, शिंगवे या गावांना मीना नदीचे पात्र वरदान ठरले असून, येथे सात कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. यंदा या परिसरात अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे मीना नदीपात्र कोरडेठाक पडले आहे. या भागातील बहुतांश शेतकरी मिना नदीच्या पाण्यावर अवलंबुन आहे. या भागातील मीना नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांमधील पाणीसाठा संपुष्टात आल्याने शेतीपिकांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या भागातील विहीरींनीही तळ गाठला असुन अनेक बोअरवेलही पाण्याअभावी बंद पडले आहे.
केटी बंधाऱ्यातील पाणीसाठा संपुष्टात आल्याने अनेक शेतकऱ्यांचे नदीवरील वीजपंप उघड्यावर पडले आहेत. शेतकऱ्यांनी अंतिम टप्प्यात आलेल्या पिकांना पाणी द्यायचे कुठून ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. परिसरातील अनेक शेतकऱ्यांचा कांदा पिक अंतिम टप्प्यात आले असुन काही शेतकऱ्यांचे उसाचे पिक तसेच मोठ्या प्रमाणावर गुरांचा चारा पिकेही आहेत. सध्या या पिकांना पाण्याची नितांत गरज आहे.
पाणी सोडण्याची मागणी
आताच पाणीटंचाई निर्माण झाल्याने या पुढील काळात शेतीपिकांना पाणी द्यायचे कुठून, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. या भागातील शेतकरी नदीच्या पाण्यावर अवलंबुन असुन सध्या पाण्याअभावी शेती पिके सुकून चालली आहे, तरी जलसिंचन विभागाने लवकरात लवकर मीना नदीला पाणी सोडण्याची कार्यवाही करावी व तालुक्याच्या पुर्व भागातील शेतकऱ्यांची पाण्याची गंभीर समस्या सोडवावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.