
शिक्षण क्षेत्रातील 'एन्ट्री'चे ठरणार भवितव्य, १० हजारांपेक्षा जास्त उमेदवार देणार टीईटी परीक्षा
यवतमाळ: शिक्षण क्षेत्रात प्रचंड उत्सुकता निर्माण करणारी टीईटी परीक्षा रविवारी (दि. २३) घेतली जात आहे. या परीक्षेला जिल्ह्यातून १० हजार ३७३ बेरोजगार तसेच काही कार्यरत शिक्षकही बसणार आहेत. २०१८ आणि २०१९ च्या परीक्षेत झालेले घोटाळे, त्यानंतर यंदा सप्टेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे टीईटी परीक्षा अतिशय संवेदनशील बनली आहे. या शिक्षक पात्रता (टीईटी) परीक्षेत होणारा गैरप्रकार रोखण्यासाठी फ्रिस्किंग, परीक्षार्थीचा चेहरा ओळखण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी आदी कडक उपाययोजना करण्यात येणार आहे. याशिवाय उमेदवारांना परीक्षा केंद्रात मोबाइल, बॅग आणि बूटदेखील नेता येणार नाही. कोणताही गैरप्रकार घडणार नाही, यासाठी केंद्र संचालकांसह यंत्रणेने सतर्क रहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिले.(फोटो सौजन्य – istock)
जिल्हा परिषद सभागृहात टीईटी परीक्षा संदर्भात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. यावेळी शिक्षणाधिकारी किशोर पागोरे, उपशिक्षणाधिकारी योगेश डाफ, डॉ. नीता गावंडे, डॉ. शिल्पा पोलपेल्लीवार, राजू मडावी यांच्यासह गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते. टीईटी परीक्षेसंदर्भात शासनाकडून देण्यात आलेल्या निर्देशांचे पालन करावे, सीसीटीव्ही, फ्रिस्किंग, बायोमेट्रिक हजेरी राहणार आहे. हॉलमध्ये
जाण्यापूर्वी प्रत्येक उमेदवाराची कसून तपासणी करण्यात यावी, परीक्षा सुरू असताना एकही परीक्षार्थी केंद्राबाहेर जाणार नाही, याची खबरदारी घेण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले. दिव्यांग उमेदवारांची परीक्षा केंद्रावर गैरसोय होऊ नये, यासाठी तळमजल्यावर व्यवस्था करण्याची सूचना करण्यात आली. ओळखीच्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारची सूट देऊ नये, अशा सूचनाही यावेळी करण्यात आल्या. जिल्ह्यात ४ केंद्रे मिळून १ झोन तयार करण्यात आला असून पहिल्या पेपरसाठी ४ झोन आणि दुसऱ्या पेपरसाठी ६ झोन स्थापन करण्यात आले आहेत. प्रत्येक केंद्रावर १ सहाय्यक परीक्षक, तर प्रत्येक परीक्षा वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. परीक्षार्थ्यांच्या फेस रिडिंग व मेटल डिटेक्शन तपासणीची सुविधा उपलब्ध असून, विद्यार्थ्यांनी परीक्षास्थळी परीक्षेच्या किमान दीड तास आधी उपस्थित राहावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.
MLA अस्लम शेखांविरुद्ध नागरिक एकवटणार; बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात मालवणीत मोर्चा
टीईटीचा पहिला पेपर रविवारी (दि. २३) सकाळी १०.३० ते दुपारी १ तर दुसरा पेपर दुपारी २.३० ते सायंकाळी ५ या वेळेत घेण्यात येणार आहे. पेपर एकसाठी १६ तर पेपर दोनसाठी २३ केंद्र राहणार आहेत. केंद्रावर त्याच शाळेच्या मुख्याध्यापकांची केंद्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली, वर्गखोल्या निश्चित असून, एका वर्गात २४ विद्यार्थी बसतील असे नियोजन राहणार आहे.