राज्यात मोठ्या घडामोडी; अपक्ष आमदार तातडीने हेलीकॉप्टरने मुंबईला रवाना
नारायणगाव : जुन्नर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार माजी आमदार शरद सोनवणे यांचा तब्बल ६ हजार ६६४ मतांनी विजयी झाला आहे. विद्यमान आमदार अतुल बेनके यांचा पराभव होऊन ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. तर महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांना दुसऱ्या क्रमांकाची मते पडली आहेत. सोनवणे यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सत्यशील शेरकर यांचा पराभव केला आहे.
सत्यशील शेरकर यांना ६६ हजार ६६४ मते मिळाली. शरद सोनवणे यांना ७३ हजार ३५५ मते पडली आहेत. तर आमदार अतुल बेनके यांना ४८ हजार १०० मते मिळाली. तसेच वंचित आघाडीचे उमेदवार देवराम लांडे यांना २२ हजार ४०१ मते मिळाली. भाजपच्या बंडखोर अपक्ष उमेदवार आशाताई बुचके यांना ९ हजार ४३५ एवढे मतदान झाले आहे. शरद सोनवणे २०१४ च्या निवडणुकीमध्ये मनसेचे एकमेव आमदार म्हणून जुन्नर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल बेनके यांनी त्यांचा पराभव केला होता. तर २०२४ च्या निवडणुकीत पुन्हा एकदा शरद सोनवणे निवडून आले आहेत.
हे सुद्धा वाचा : इंदापूरमध्ये भरणेंची विजयाची हॅट्रिक; हर्षवर्धन पाटलांचा दारुण पराभव
कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
दरम्यान, सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात झाल्यावर पोस्टल मते मोजण्यात आली. अतुल बेनके यांना २५० सत्यशील शेरकर यांना ५०९ तर देवराम लांडे यांना ३८२ मते पडली. तसेच आशाताई बुचके यांना पोस्टलची ३० मते मिळाली. पहिल्या २ फेरीला वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार देवराम लांडे पुढे होते. परंतु तिसऱ्या फेरीपासून शरद सोनवणे आघाडी घेण्यास सुरुवात केली. ही आघाडी सोनवणे यांनी शेवटपर्यंत टिकून ठेवली. १५ व्या फेरीला ते लेण्याद्री मतमोजणी केंद्रावर आले. यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. शरद सोनवणे यांच्यासोबत कोणीही मोठा नेता नसताना त्यांनी विजय मिळवला. त्यांच्या सोबतीला फक्त माजी आमदार बाळासाहेब दांगट व शरद पवार गटाचे सूरज वाजगे आणि शेतकरी संघटनेचे नेते आंबादास हांडे होते. प्रत्येक गावातील तरुणांचा संच त्यांच्या पाठीशी होता.
मी अपक्ष म्हणून जरी निवडून आलो असलो तरी राज्यातील महायुतीला पाठिंबा देणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला मुंबईला नेण्यासाठी हेलीकॉप्टर पाठविले आहे. मी अपक्ष म्हणूनच सरकारला पाठिंबा देणार असून, जुन्नरला मंत्रिपद मिळवण्याचा प्रयत्न राहील.
– शरद सोनवणे