
विठ्ठल-रुक्मिणी शाही विवाह साजरा संपन्न
शेकडो वऱ्हाडींच्या साक्षीने भाविक-भक्तांनी अनुभवला साेहळा
विठ्ठल-रुक्मिणी विवाह सोहळ्याला शेकडो वर्षाची परंपरा
पंढरपूर: दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही वसंत पंचमीचे औचित्य साधून पंढरपूरमध्ये मंदिर समितीच्यावतीने विठ्ठल- रखुमाई शाही विवाह सोहळा साजरा करण्यात अाला. दुपारी १२ वाजता मंदिरातील मुख्य सभा मंडपात हा साेहळा भाविक-भक्तांनी अनुभवला. या सोहळयासाठी राज्याच्या विविध भागातून हजारो भाविक, वऱ्हाडी मंडळी उपस्थित हाेती.
विठ्ठल-रुक्मिणी विवाह सोहळ्याला शेकडो वर्षाची परंपरा असल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. विवाह सोहळ्यासाठी श्री विठल-रुक्िमणी रखुमाईच्या दोन मूर्तींना नवरा नवरी प्रमाणे दागदागिने आणि भरजरी पोशाख घालून नटविण्यात अाले होते. भाविकांनी याची देही याची डोळा हा सोहळा अनुभवला. यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष औसेकर महाराज, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक संदेश भोसले, मंदिर समितीचे सर्व सदस्य व कर्मचारी उपस्थित हाेेते. मंदिर समितीच्या वतीने वऱ्हाडी मंडळीची जेवणाची व्यवस्था करण्यात आली हाेती. जेवणात बंदी लाडू, बालूशाही, खारी बुंदी, चपाती, भाजी, कोशिंबीर आदी नऊ पदार्थाचा समावेश हाेता.
मूळ मूर्त्यांची विधिवत पूजा
देवा ब्राह्मणांच्या साक्षीने सात मंगल अष्टका म्हणून तांदूळ आणि फुलांचा वर्षावात अध्यात्मिक विवाह सोहळा साजरा करण्यात अाला. सोहळ्याच्या निमित्ताने मंदिरातील मूळ मूर्त्यांची विधिवत पूजा करून देवाच्या अंगावर गुलालाची उधळण करण्यात आली. यावेळी महिला भाविक देवाच्या गाण्यावर ठेका धरला. या दिवसापासून देवाला रोज पांढरा पोशाख घालून रंगपंचमीपर्यत अंगावर रंग टाकला जातो.
सनई चौघड्याच्या सुरात वरात
सोहळा झाल्यानंतर मंदिर समितीच्यावतीने फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली. सायंकाळी पाच वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची वाजत गाजत सनई चौघड्याच्या सुरात व बँडच्या गजरात शाही वरात काढण्यात आली. या वरातीत हजारो भाविक भक्त व अबालवृद्धांनी सहभागी हाेत विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या विवाह सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात, चौखांबी, श्री संत नामदेव पायरी, श्री विठ्ठल सभामंडप आदी प्रमुख ठिकाणी अत्यंत आकर्षक व देखणी फुलांची सजावट करण्यात आली आहे. या सजावटीसाठी सुमारे चार ते साडेचार टन फुलांचा वापर करण्यात आला असून त्यामध्ये गुलाब, आस्टर, लाल व पिवळा झेंडू, जरबेरा, ऑर्किड, शेवंती, बिजली आदी विविध प्रकारच्या व रंगांच्या फुलांचा समावेश आहे. संपूर्ण सजावट अत्यंत कलात्मक पद्धतीने साकारण्यात आली असून यासाठी ५० ते ६० कुशल कारागिरांनी अथक परिश्रम घेतले आहेत. विठ्ठल भक्त भारत भुजबळ (पुणे) यांनी मोफत स्वरूपात सदरची सजावट करून दिली. मंदिर परिसर अधिकच मनोहारी व भक्तिमय झाल्याने भाविकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.