इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा (फोटो- सोशल मीडिया)
आळंदीच्या वैभवाला प्रदूषणाचे ग्रहण
आधी मृत मासे अन् पांढरा फेस
श्रद्धेच्या इंद्रायणीला प्रदूषणाचा विळखा
पिंपरी: तीर्थक्षेत्र आळंदीतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली पवित्र इंद्रायणी नदी सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतून येणारे रसायनयुक्त सांडपाणी आणि मैलामिश्रित पाण्यामुळे नदीचे पात्र पुन्हा एकदा पांढऱ्या फेसाने ओसंडून वाहत आहे. विशेष म्हणजे, डिसेंबर महिन्यात नदीत मोठ्या प्रमाणात मृत माशांचा खच पडल्याची घटना ताजी असतानाच, आता फेसाळलेल्या पाण्यामुळे प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे वारकरी, भाविक आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
प्रदूषणाची भीषणता आणि प्रशासकीय अनास्था
गेल्या काही दिवसांपासून इंद्रायणीच्या पात्रात रसायनांचे थर साचल्याने पांढरा शुभ्र फेस पाहायला मिळत आहे. यापूर्वी डिसेंबर महिन्यात प्रदूषित पाण्यामुळे प्राणवायूची पातळी खालावल्याने हजारो मासे मृत पावले होते. नदीकाठी मृतावस्थेत पडलेल्या माशांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. मात्र, एवढी भीषण परिस्थिती ओढवूनही राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) आणि आळंदी नगरपरिषद प्रशासनाकडून ठोस कारवाईऐवजी केवळ बघ्याची भूमिका घेतली जात असल्याचा आरोप होत आहे.
नदीचे पात्र अरुंद; राडा-रोड्याचे साम्राज्य
नदी स्वच्छ करण्याऐवजी पात्रात मोठ्या प्रमाणात राडा-रोडा आणि कचरा टाकला जात आहे. पुलांच्या बांधकामावेळी पडलेला मलबा अद्याप काढण्यात आलेला नाही, परिणामी नदीचे पात्र अरुंद झाले आहे. तसेच पूर नियंत्रण रेषेत (Blue Line) राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध बांधकामांकडे महसूल आणि पालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.
विकासाच्या नावाखाली केवळ ‘कागदी’ घोडे
“नदी स्वच्छ न करता नदीकाठचा विकास कशासाठी?” असा रोकडा सवाल आता नागरिक विचारत आहेत. जय गणेश मंदिर परिसर, श्री स्वामी महाराज घाट आणि स्मशानभूमी भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. केवळ नदीकाठच्या सुशोभीकरणावर भर दिला जात असून, प्रत्यक्ष पाणी शुद्धीकरणासाठी कोणतीही यंत्रणा कार्यान्वित नाही. श्री स्वामी महाराज घाटाजवळील भुयारी मार्ग (सब-वे) अद्याप वापरासाठी खुला न केल्याने भाविकांची मोठी गैरसोय होत आहे. काही वर्षांपूर्वी येथे झालेल्या अपघातात एका वारकरी महिलेचा मृत्यू होऊनही प्रशासन ढिम्म असल्याची टीका होत आहे.
जलशुद्धीकरण यंत्रणेवर ताण
इंद्रायणीचे पाणी पिण्यायोग्य न राहिल्याने आळंदी नगरपरिषदेला भामा-आसखेड धरणातून पाणी मागवावे लागत आहे. नदीतील प्रदूषणामुळे स्थानिक जलशुद्धीकरण केंद्रावर अतिरिक्त ताण पडत असून, पाणी साठवण बंधाऱ्यांच्या गळतीमुळे पाणी टंचाईचे संकटही गडद होत आहे.
जगायचं तरी कसं! राज्यातील ‘या’ शहराला प्रदूषणाचा विळखा; नागरिकांना श्वास घेणे झाले कठीण
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे साकडे
नमामि इंद्रायणी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर आणि आळंदी जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र घुंडरे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदने देऊन या प्रकरणी तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे. इंद्रायणीचे प्रदूषण रोखण्यासाठी ‘नमामि गंगे’च्या धर्तीवर ठोस कृती आराखडा राबवावा, अशी मागणी जोर धरत आहे.






