Photo Credit : Team Navrashtra
पुणे: महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज (12 जुलै) मतदान मुंबईत सुरू आहे. मुंबईत मुसळधार पाऊस पडत असतानाही विधानपरिषद निवडणुकीचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. रिसॉर्टच्या राजकारणापासून डिनर डिप्लोमसीपर्यंत, सत्ताधारी महायुतीपासून विरोधी महाविकास आघाडीपर्यंत, दोन्ही गोटातील आमदारांना एकसंध ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहेत. विधान परिषदेच्या 11 रिक्त जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत.
पण, या निवडणुकीने दोन वर्षांपूर्वीच्या घडलेल्या राजकीय घडामोडीही ताज्या झाल्या आहेत. दोन वर्षांपूर्वीच म्हणजे 2022 मध्ये विधान परिषद निवडणुकांनंतर एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीची साथ सोडली होती.
दोन वर्षांपूर्वी 2022 मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 11 उमेदवार रिंगणात होते. त्यासाठी 20 जून रोजी मतदान झाले होते. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमधील प्रत्येकी दोन उमेदवार उभे केले होते. भारतीय जनता पक्षाने (भाजप) पाच उमेदवार उभे केले होते. एका जागेसाठी लढत होती आणि उमेदवाराचा विजय निश्चित करण्यासाठी 287 सदस्य संख्या असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या 26 सदस्यांची मते आवश्यक होती.
त्यावेळी महाविकास आघाडीकडे 151 आमदार होते. शिवसेनेचे 55, काँग्रेसचे 44 आणि राष्ट्रवादीचे 52 आमदार होते. सहाव्या उमेदवाराचा विजय निश्चित करण्यासाठी युतीला पाच आमदारांच्या पाठिंब्याची गरज होती. तर भाजपचे संख्याबळ 106 आमदार होते. पाचही उमेदवारांचा विजय सुनिश्चित करण्यासाठी 130 मतांची आवश्यकता होती आणि चार उमेदवारांचा विजय सुनिश्चित केल्यानंतर पक्षाकडे पाचव्या उमेदवारासाठी फक्त दोन मते शिल्लक होती. भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले आणि पक्षाच्या उमेदवारांच्या बाजूने एकूण 134 मते मिळाली.
विधानपरिषेदच्या याच निवडणुकीपासून शिंदेनी पारडे बदलले होते. 20 जूनला विधानपरिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मंत्री एकनाथ शिंदे निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच 11 आमदारांसह सुरतला पोहोचल्याची बातमी आली. उद्धव ठाकरेंपासून ते शिवसेना आणि MVA नेते सक्रिया झाले होते. एकनाथ शिंदे यांची मनधरणीसाठी प्रयत्न सुरू झाले. पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. एकापाठोपाठ एक आमदार शिंदेकडे सुरतला पोहचू लागले. गुजरातमधील मुक्काम सोडत त्यांनी गुवाहाटी गाठली. शिंदेंच्या गोटातील आमदार वाढत गेले आणि अखेर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत युती केली आणि नवीन सरकारमध्ये मुख्यमंत्री बनले. शिवसेनेचे 55 पैकी 40 आमदार शिंदे यांच्यात सामील झाले होते. निवडणूक आयोगापर्यंत चाललेल्या नाव आणि चिन्हाच्या लढाईतही शिंदे विजयी झाले आणि उद्धव ठाकरेंना स्वतःचा पक्ष सोडून नवा पक्ष काढावा लागला. 10 जागांच्या या एमएलसी निवडणुकीने केवळ महाराष्ट्र सरकार आणि विधानसभेची आसनव्यवस्थाच बदलली नाही तर भविष्यातील राजकीय चित्रही बदलले.