मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाले असून महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. महायुतीला 229 जागा मिळाल्या असून महाविकास आघाडीला 46 जागा मिळाल्या आहेत. राज्यभरात महायुतीचा जल्लोष सुरू आहे. एकीकडे महायुतीच्या गोटाच आनंदाचे वातावरण असातना दुसरीकडे विरोधी महाविकास आघाडीकडून या निकालात काहीतरी गडबड असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. पण या सर्वात महायुतीच्या विजयाचे सिक्रेट काय आहे, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, महायुतीच्या विजयानंतर महायुतीची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेने मतांचा वर्षाव केला. लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी या सर्वांनी महायुतीवर प्रेम दाखवलं, या ऐतिहासिक विजयासाठी मी त्यांना दंडवत घातला पाहिजे. गेल्या दोन वर्षात आम्ही जे काम केलं,जे निर्णय घेतले, ते अभूतपूर्व होते. असं म्हणत जनतेचे आभार मानले.
Mahayuti PC News: खरी शिवसेना, खरी राष्ट्रवादी कुणाची हे लोकांनी ठरवलं; एकनाथ शिंदेनी डिवचलं
महायुतीच्या निकालामागे लाडकी बहीण योजनेला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीच्या विजयात भर पडली ,असं राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. पण लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात बसलेल्या फटक्यानंतर भाजप महायुती आघाडीने राज्यात माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत राज्यातील महिलांना दहमहा 1500 रुपये दिले जाऊ लागले. हीच योजना महायुसाठी गेमचेंजर ठरली.
महाराष्ट्र सरकारने 28 जून 2024 रोजी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यास मान्यता दिली होती. या योजनेद्वारे महाराष्ट्रातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील पात्र महिलांना 1,500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. या योजनेचा लाभ थेट महिलांना त्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे दिला जात आहे. राज्यातील महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य सुधारण्यासाठी, त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची महत्त्वाची भूमिका मजबूत करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
माझी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर उपलब्ध माहितीनुसार, या योजनेसाठी एकूण 1.12 कोटी अर्ज आले होते. पोर्टलवर स्वीकारलेल्या अर्जांची एकूण संख्या 1.06 कोटी आहे.तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत 2.34 कोटी पात्र महिलांना आर्थिक लाभ मिळवून देणे, हेच या योजनेचे उद्दिष्ट असल्याचे महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले होते.
रक्षाबंधनाच्या दिवशी सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा सरकारने महाराष्ट्राच्या पुरवणी अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला. या योजनेसाठी राज्याच्या तिजोरीतून वार्षिक 46,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. या योजनेंतर्गत महाराष्ट्र सरकारने दिवाळी बोनस 2024ही जाहीर केला होता. पात्र महिलांना लाडकी बहीण योजना दिवाळी बोनस 2024 उपक्रमाद्वारे चौथ्या आणि पाचव्या हप्त्यासाठी पेमेंट म्हणून 3,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले.