विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवारांची आज तिसरी यादी जाहीर केली. फलटण, निफाड, पारनेर आणि गेवराई या मतदारसंघातील उमेदवारांंचा या यादीत समावेश आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी राज्यात मतदान पार पडणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच राज्यातील सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. सध्या सर्वच पक्षांकडून उमेदवारी यादीची घोषणा करण्यात येत आहे. त्यातच आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण चार मतदारसंघांसाठी अजित पवार यांनी आपले उमेदवार दिले आहेत.
तिसऱ्या यादीत कोणाकोणाची नावे?
गेवराई – विजयसिंह पंडित
फलटण- सचिन पाटील
निफाड – दिलीपकाका बनकर
पारनेर – काशिनाथ दाते
निलेश लंकेंच्या पत्नीविरुद्ध उमेदवार ठरला
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून परनेर या मतदारसंघासाठी खासदार निलेश लंके यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे निलेश लंके तसेच त्यांच्या पत्नी राणी लंके यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. महायुतीकडून मात्र या जागेवर अद्याप उमेदवार ठरला नव्हता. दरम्यान, आता अजित पवार यांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पारनेर या जागेसाठी उमेदवार देण्यात आला आहे. येथून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून काशीनाथ दाते हे निवडणूक लढवणार आहेत. म्हणजेच या जागेवर अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात थेट लढत होणार आहे.
झिशान सिद्दीकींचा अजित पवार गटात प्रवेश
अजित पवार गटाने मोठी खेळी केली आहे. अजित पवार गटात अनेक दिग्गजांनी प्रवेश घेतला. काँग्रेस नेते आणि वांद्रे पूर्वचे विद्यमान आमदार झिशान सिद्दीकी यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून ते अजित पवार गटात प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. अखेर अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत झिशान सिद्दीकी यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. झिशान सिद्दीकी यांनी अजित पवार गटात प्रवेश घेताच त्यांना एबी फॉर्म देण्यात आला. तसेच वांद्रे पूर्व मतदारसंघातून त्यांना उमेदवारीही जाहीर करण्यात आली.
नवाब मलिक वेटिंग लिस्टवर का?
मलिक हे अणुशक्तीनगरमधील विद्यमान आमदार आहेत. मलिक यांच्याऐवजी त्यांची कन्या सना मलिक ही निवडणुकीच्या मैदानात असणार आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार नवाब मलिक यांचा पत्ता कट झाला आहे. नवाब मलिक यांना उमेदवारी न देण्यावरून भाजपने ठाम भूमिका घेतली होती. मलिक हे मविआ सरकारच्या काळात मंत्री असताना विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप आणि दिलेल्या पुराव्यांमुळे नवाब मलिक हे तुरूगांत होते. त्याआधी नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदा घेत तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोपांचा धुरळा उडवला होता.