शिवाजी विद्यापीठ नामविस्ताराचा वाद पेटण्याची चिन्हे; आंदोलनाचा दोन्ही बाजूंनी इशारा
कोल्हापूर/दिपक घाटगे : कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराची चर्चा मागील काही महिन्यांपासून सुरू होती. मात्र या नामविस्ताराची ठिणगी मोठे रुप धारण करण्याची शक्यता असून, टोकाचे समर्थन आणि टोकाचा विरोध शनिवारी कोल्हापूरसह राज्यभरात दिसून आला. नामविस्तारासाठी काही संघटनांनी आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला असून, त्याला विरोध करण्यासाठी काही संघटना सरसावल्या आहेत. यासंदर्भात त्यांची आज विद्यापीठ अधिसभेनंतर बैठक झाली. नामविस्तारावरुन अधिसभेमध्ये जोरदार खडाजंगी झाली. येत्या सोमवारी नामविस्ताराच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
साठ वर्षांपूर्वी (१९६२) शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली. विद्यापीठाच्या स्थापनेच्या वेळी या विद्यापीठाच्या क्षेत्रात कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर असे पाच जिल्हे असावेत अशी योजना होती. पण रत्नागिरी जिल्हा मुंबई विद्यापीठाकडेच राहिला आणि सोलापूर जिल्हा सोलापूर विद्यापीठाकडे गेला (इ.स. २००४). त्यामुळे आता कोलहापूर, सांगली आणि सातारा असे तीनच जिल्हे कोल्हापूर विद्यापीठाच्या अधिकार क्षेत्रात येतात. गेल्या काही वर्षात विद्यापीठाने शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात चमकदार कामगिरीसह नॅकचे सर्वोच्च मूल्यांकन प्राप्त केले आहे. विविध विद्याशाखांमध्ये २७६ संलग्न महाविद्यालयांमधून हजारो विद्यार्थी याठिकाणी शिक्षण घेत आहेत. विद्यापीठाचा २७६ एकर परिसरात विस्तार असून अनेक नामाकिंत प्राध्यापक, प्राचार्य आणि अधिष्ठात्यांसह कुलगुरुंनी विद्यापीठाच्या शैक्षणिक वैभवात भर घातली आहे. तसेच विद्यापीठातून सामाजिक, शैक्षणिक विषयांवर झालेल्या विचारमंथनाचा समाजाला दिशा देण्यासाठी प्रयत्न झाला आहे. याच विद्यापीठाच्या नामविस्ताराने मात्र सध्या विद्यापीठातील वातावरण ढवळून निघाले आहे.
सिनेटमध्ये घमासान
शिवाजी विद्यापीठ हेच नाव कायम राहावे यासाठी सिनेट सदस्यांकडून अत्यंत आक्रमक भूमिका घेण्यात आली. शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत स्थगन प्रस्तावावरून गोंधळही झाला. वकील अभिषेक मिठारी यांनी स्थगन प्रस्ताव मांडला. श्वेता परुळेकर आणि अभिषेक मिठारी यांच्यासह सदस्यांनी आक्रमकपणे नामांतर प्रस्तावाला विरोध केला. त्यांनी काळ्या फिती लावून नामविस्तार बदलास विरोध केला. आमचं विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ, असे टी शर्ट घालून सिनेट सदस्य उपस्थित राहिले. या चर्चेदरम्यान माध्यमांना अधिसभेतून बाहेर काढण्यात आले. जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्याने सभागृहात गोंधळ झाला. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे नाव बदलण्याचा घाट घालणाऱ्याचा निषेध व्यक्त करत सभेत पत्रके भिरकावण्यात आली.
शिवाजी हा शब्दच मराठी माणसाठी अस्मिता आहे. या शब्दातच प्रचंड ताकद आहे. त्यामुळे विद्यापीठाचे दिलेले नाव योग्य आहे. ते बदलण्याचा कोणी प्रयत्न करू नये. जे बदलू इच्छितात त्यांना या दिलेल्या नावाचा इतिहास समजावून सांगू. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव दिले तर त्याला सीएसएम म्हणून ओळखले जाईल. जसे जेएनयूसह अन्य विद्यापीठे ओळखली जातात. त्यामुळे शिवाजी विद्यापीठ हे नाव योग्य आहे.
– जयसिंगराव पवार, ज्येष्ठ इतिहास संशोधक
मागणी कशासाठी?
विरोध कशासाठी?