
ईश्वरपुरमध्ये राजकीय घडामोडींना वेग; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?
माजी नगराध्यक्ष व अजित पवार गटाचे जिल्हाअध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यासोबत नवनिर्वाचित नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, खंडेराव जाधव यांची तीन दिवसांपूर्वी बैठक झाली आहे. त्यामध्ये जयंत पाटील गटाला पाठींबा देण्याचे निश्चित झाले आहे. सध्या नगरपालिकेच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (श. प.) २२ नगरसेवक आहेत. तर विरोधात भाजपा ३, शिवसेना २ यांचा एक गट आहे. तर उर्वरीत तीन नगरसेवक हे निशिकांत पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत.
पक्षीय बलाबल पाहता सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन स्वीकृत नगरसेवक होतात. ९ नगरसेवकांच्या पाठीमागे १ नगरसेवक असे असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.) चे २ होतात. तर त्याचे ४ नगरसेवक अतिरिक्त होत आहेत. त्यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठींबा घेत ७ नगरसेवकांचा एक गठ्ठा करून आपण एका जागेवर संधी मिळवू शकतो अशी गणित मांडल्याने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची खात्रीशीर वृत्त आहे.
अजित पवार गटाचे माजी उपनगराध्यक्ष संजय कोरे, माजी नगरसेविका मनीषा जयवंत पाटील यांचे नाव पुढे आले आहे. तर आमच्याच गटाचा नगरसेवक होईल तुम्हाला सभापतीपदी संधी देवू, अशी चर्चा झाल्याचे समजते. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांतील नेत्यांमध्ये आतून समन्वय सुरू असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
दरम्यान, याबाबत दोन्ही गटांच्या नेत्यांकडून अधिकृत कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया देण्यात आलेली नसली तरी, “स्थानिक विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे” असे सूचक वक्तव्य काही नेत्यांकडून केले जात आहे. त्यामुळे आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हे सुद्धा वाचा : “सकाळी 4 वाजता फोन…, भाजपने पैशाचा पाऊस पाडला”, अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप
एकंदरीत पाहता, स्वीकृत नगरसेवकाच्या निर्णयाने केवळ नगरपालिकेतील राजकारणच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील एकत्रीकरणाबाबतच्या चर्चांना नव्याने उधाण आणले आहे. आता यावर वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.