अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप
Ambadas Danve on Chhatrapati Sambhajinagar Election 2026 : अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांसाठी आज (15 जानेवारी) मतदान होत आहे. मुंबईसह २९ महापालिकांसाठी गुरूवारी मतदान पार पडत आहे. महापालिकांच्या या महाकुंभात एकूण ३ कोटी ४८ लाख ७८ हजार १७ मतदार आपले मतदानाचे पवित्र कार्य बजावू शकतील. याचदरम्यान मतदानाला काही तास शिल्लक असतानाच छत्रपती संभाजीनगरमधील काही ठिकाणी पैसे वाटपाच्या आरोपावरून जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी गंभीर आरोप करण्यात आले.
अंबादास दानवे यांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सर्वप्रथम मी मतदान केले, माझे मतदान प्रामाणिकपणा आणि संघर्षाचे आहे. मला पहाटे ४ वाजेपर्यंत फोन आले की, कशाप्रकारे भाजप पैशाचा पाऊस या शहरात पाडत आहे. भारतीय जनता पक्षाला पैशाचा माज आलाय. भारतीय जनता पक्षाचे नेते फार विकासाच्या गोष्टी करतात मग तुम्हाला पैशांचा पाऊस का पाडावा लागतो? कामाच्या आधारावर मतदान मागितले पाहिजे, परंतु असे झालेले नाही. जनता सुज्ञ आहे असून जनता निश्चितपणे भाजपला त्यांची जागा दाखवून देईल, असा हल्लाबोल त्यांनी भाजपवर केला.
प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा दबाव आहे. निवडणूक आयोग कुंभकर्णाची झोप घेत आहे. निवडणूक आयोग या प्रक्रियेत कुठेही दिसत नाही. मतदारांनी प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करावा. प्रशासनाच्या दबावाखाली एकतर्फी पद्धतीने एका बाजूला एक न्याय तर दुसऱ्या बाजूला दुसरा न्याय दिला जातो आणि पात्र मतदारांच्या बाजूने न्याय दिला जातो, असे अंबादास दानवे यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधताना म्हटले आहे.
अंबादास दानवे पुढे म्हणाले की, राज्यात बदलाची गरज आहे. विकासाचा खोटा फुगा उभा केला जातोय. २०२५ मध्ये राज्यात ११५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांनी मतदारांना खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या प्रचारापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान मुंबई महापालिकेच्या निकालाकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. अनेक नेत्यांचे राजकीय भविष्य ठरवणारी आणि राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारी अशी ही महापालिका निवडणूक असणार आहे. मतदान पार पडल्यानंतर लगेचच शुक्रवारी १६ तारखेला निकाल घोषित होणार आहेत. १६ तारखेच्या दुपारी ४ वाजेपर्यंत महापालिका निकालांचे चित्र पूर्णपणे स्पष्ट झालेले असेल.






