
पुणे : वाहन चोरीसोबतच शहरात वाहनांचे पार्ट चोरीच्याही घटना घडत असताना पुणे पोलिसांच्या समर्थ पोलिसांनी सुतावरून स्वर्ग गाठला आहे. रात्रीच्या वेळी रिक्षांचे टायर आणि बॅटर्यांची चोरी करणार्या सराईताला शिताफिने अटक केली आहे. पोलिसांनी तपास करताना सीसीटीव्हीत चोरीच्या वेळी वापरण्यात आलेल्या रिक्षाचा ब्रेक लावला की त्या रिक्षाची फ्लॅश लाईट लागत होती. त्यावरून पोलिसांनी या चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत.
शादाब युसुफ अन्सारी (वय २२, रा. गल्ली नंबर 25, सय्यदनगर, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याने शहरातील विविध भागात या चोऱ्या केल्या असल्याचे समोर आले असून, तो या बॅटरी व टायर विक्री करत होता का तसेच त्याचे कोणी साथीदार आहेत का, याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे. ही कारवाई परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदिपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रमेश साठे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, तसेच उपनिरीक्षक सौरभ माने व त्यांच्या पथकाने केली आहे.
पुण्याच्या मध्यभागात काही दिवसांपासून रिक्षांचे टायर चोरीच्या घटना घडत आहेत. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ निरीक्षक रमेश साठे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. पथकाने मध्यभागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी एक रिक्षा या भागात येवुन रिक्षाच्या बाजुला रिक्षा लावुन चोरी करीत असल्याचे दिसुन आले. चोरी करणार्या रिक्षाचा ब्रेक मारल्यानंतर पाठीमागे फ्लॅश लाईट लागत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी सलक पाच दिवस रात्रीच्या वेळी ब्रेक मारल्यास पाठीमागे फ्लॅश लाईट लागणार्या रिक्षाचा शोध घेतला. त्यावेळी एक रिक्षा ताब्यात घेण्यात आली. या रिक्षात पथकाला पोत्यात भरलेले ८ टायर आणि २ बॅटर्या सापडल्या. अधिक चौकशी केली असता त्याने आणखी चोरलेले टायर पोलिसांच्या हवाली केले. त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याच्याकडून २५ रिक्षांचे टायर व दोन रिक्षाच्या बॅटर्या जप्त करण्यात आल्या आहेत.
[blockquote content=”अटक करण्यात आलेल्या अन्सारी याच्यावर सहा चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तो भाडेतत्वावर रिक्षा चालवत होता. नंतर रात्रीच्या वेळी उभ्या असलेल्या रिक्षाचे टायर चोरत होता. त्याच्या रिक्षाच्या फ्लॅश लाईटवरून त्याला अटक करण्यात आली आहे.” pic=”” name=”- रमेश साठे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, समर्थ पोलिस ठाणे.”]