
पुणेकरांनो, काळजी घ्या ! पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा इशारा
पुणे : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यात दिवसा कडक उन्ह तर कधी पाऊस होत आहे. असे असताना ऐन दिवाळीत पावसाने शहरात हजेरी लावली आहे. त्यानंतर आता पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह अति हलका ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याच्या वेधशाळेने वर्तविला आहे.
बंगालचा उपसागर, अरबी समुद्रातील स्थितीमुळे ऐन दिवाळीत राज्याच्या काही भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत. गुरुवारी शहर आणि परिसरात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहे. २६ ऑक्टोबरपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागराच्या दक्षिण-पश्चिम भागात निर्माण झालेला चांगला विकसित कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होण्याची तसेच पश्चिम-उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Rain Alert: आज बाहेर पडूच नका! पुणे-मुंबईसह २६ जिल्ह्यांना यलो अलर्ट; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
त्याशिवाय अरबी समुद्रातही विकसित होत असलेला कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होऊन उत्तर-पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे. परिणामी, पुणे शहर आणि परिसरात पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आहे. बुधवारी, तसेच गुरुवारी ऊन आणि ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी पावसाची नोंद झाली.
मध्य महाराष्ट्र, कोकणातही पावसाचा अंदाज
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यासह मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पुढील दोन ते तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्रात सोसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. पुणे आणि परिसरात पुढील दोन ते तीन दिवस आकाश दुपारनंतर ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनांसह पावसाची शक्यता आहे.