फोटो सौजन्य - सोशल मिडीया
कोल्हापुर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात असणारा तिलारी घाट ३१ ऑक्टोबरपर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तिलारी घाटातील संरक्षक कठडे जीर्ण आणि नादुरुस्त आहेत. तसेच कोल्हापुरच्या चंदगड तालुका आणि तिलारी घाटात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत तिलारी घाटातून प्रवास करणे धोकादायक ठरू शकते. या मार्गातून एसटी बसची वाहतूक सुध्दा सुरु असते. त्यामुळे प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर शासनाने तिलारी घाट ३१ ऑक्टोबरपर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गावर वळविण्यात येणार आहे. अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी तिलारी घाटाऐवजी आंबोली आणि चोर्ला या मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
कोल्हापुरच्या चंदगड तालुका आणि तिलारी घाटात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले असून वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात तिलारी घाटातून प्रवास करणे धोकादायक ठरू शकते. तिलारी घाटातून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होते. ही वाहने बेळगांव, शिनोळी, पाटणे फाटा, हलकर्णी, नागनवाडी, चंदगड, हेरे, मोटणवाडी, तिलारीनगर या मार्गावरुन येतात. तसेच बेळगांव, कर्नाटक येथुन गोव्याला जाणारा जवळचा रस्ता तिलारी घाटातुनच जातो. त्यामुळे या घाटातून अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. तिलारी घाटाचा मार्ग अवजड वाहनांसाठी अरुंद आहे. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. काही वेळा अरुंद रस्त्यामुळे अवजड वाहने तिलारी घाटाच्या मार्गावरच अडकून राहतात. त्यामुळे इतर वाहनांना अडथळा निर्माण होतो.
अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांना मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे वाहन चालकांना आणि प्रवाशांना धोका निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने तिलारी घाट ३१ ऑक्टोबरपर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अवजड वाहनांनी वाहतुकीसाठी तिलारी घाटाऐवजी आंबोली घाट आणि कर्नाटक राज्यातील चोर्ला या मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. संकेश्वर-गडहिंग्लज-आजरा- आंबोली ते बांदा या महामार्गाचे काम ३१ जूनपर्यंत पूर्ण होणार आहे.