Covid चा संसर्ग पुन्हा सुरु ! म्हणूनच ऑक्सिजन निर्मितीसाठी पालघरमध्ये उचलले गेले 'हे' महत्वाचे पाऊल
दीपक गायकवाड/मोखाडा: चीन,सिंगापूर आणि हॉंगकॉंग या देशांमध्ये पुन्हा सुरू झालेला कोरोनाचा संसर्ग उद्या मुंबई महाराष्ट्र आणि देशात वाढू शकतो. ऑक्सीजन ही सर्वांची गरज आहे त्यासाठीच पालघर आणि ठाणे जिल्ह्यात एक कोटी बांबू वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेत आहोत, असे मुख्यमंत्री पर्यावरण संतुलित विकास कृती दलाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी म्हटले.
महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार वनपट्टे तसेच खाजगी जमिनीवर बांबू लागवड करीता पालघर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये बांबू लागवड मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानुसार दि. १६ मे, २०२५ ते १९ मे, २०२५ या कालावधीत ‘बांबू मिशन शेतकरी मेळावे’ आयोजित करण्यात आले आहेत.
शनिवारी (१७ मे) पालघर येथील वाडा आणि विक्रमगड मध्ये बांबू मिशन शेतकरी मेळावे पार पडले यावेळेस मोठ्या संख्येने परिसरातील आदिवासी शेतकरी आणि बांबू उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
या दोन्ही मेळाव्यामध्ये उपस्थित आदिवासी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना पाशा पटेल म्हणाले, ” ऑक्सिजन ही सर्वांची गरज आहे हे आपण मागच्या कोरोनाच्या संकटात अनुभवले आहे. आता पुन्हा चीन,सिंगापूर आणि हॉंगकॉंग या देशांमध्ये कोरोनाची साथ सुरू झाल्याच्या बातम्या येत आहे. ऑक्सीजन झाडे निर्माण करतात हे त्रिवार सत्य आहे. जलद हरित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी बांबू लागवड शिवाय पर्याय नाही, असे ते म्हणाले.
माणसाला दरवर्षी २८० किलो ऑक्सीजन लागतो. दिवसाला तीन फूट वाढणारा बांबू एका वर्षात 320 किलो ऑक्सीजन निर्मिती करतो. आणि 35 टक्के कार्बन शोषून घेतो. मराग्रहयो योजनेतून महाराष्ट्र सरकार हेक्टरी 7 लाख चार हजार रुपयांचे अनुदान देत आहे. यामध्ये मजुरी आणि खड्डे खंदने तसेच रोपांचा पुरवठा करण्याचा खर्चाचा देखील समावेश आहे, असे त्यांनी सांगितले.
कोकणातील भात शेती आता परवडण्यासारखी राहिली नसल्याचे निदर्शनास आणून देत पाशा पटेल पुढे म्हणाले, ” पारंपरिक शेती करून शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाही शिल्लक देखील राहत नाही. त्यामुळे आता शहरी लोकांसाठी ऑक्सिजन निर्माण करणारा बांबू अधिक सरकारचे अनुदान आणि बांबू पासून निर्माण होणाऱ्या 2000 वस्तू आगामी काळात सर्व बांबू उत्पादक शेतकऱ्यांचे आयुष्य परिवर्तित करणार आहे.”
यंदाच्या अर्थसंकल्पात बांबू आधारित उद्योगांच्या निर्मितीसाठी राज्य सरकारने 4300 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. प्रस्तावित पाशा पटेल स्किल टेक विद्यापीठाच्या माध्यमातून बाबू उद्योगांमधील कौशल्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम देखील हाती घेण्यात येणार आहे, असे पाशा पटेल यांनी स्पष्ट केले.
वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित म्हणाल्या, ” चाळीस वर्षानंतर विवेक भाऊ आणि पाशा भाऊ एकत्र येऊन पालघर जिल्ह्यातील आदिवासींचे जीवन परिवर्तित करीत आहेत. उन्हाकाचे पट्टे मिळाले पण त्यामध्ये आता बांबू लागवड करून आयुष्य बदलायचे आहे. उन्हाळ्यात बांबू लागवड वाचवण्यासाठी आदिवासी शेतकऱ्यांना शेततळ्याची योजना देखील द्यावी अशी त्यांनी यावेळी मागणी केली.”
Sanjay Shirsat: “तुमच्या जहाजातले उंदीर…”; संजय शिरसाटांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका
विक्रमगडचे आमदार हरिश्चंद्र भोये यांनी देखील विक्रमगड तालुक्यामध्ये जास्तीत जास्त बांबू लागवड व्हावी त्यासाठी आवश्यक सहकार्य प्रशासनाला केले जाईल असे सांगितले.
आंतरराष्ट्रीय बांबू तज्ञ आणि कॉनबॅकचे व्यवस्थापकीय संचालक संजीव करपे यांनी 21 वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग मध्ये शेतकऱ्यांनी हापूस आंबा आणि काजूचे पिक सोडून बांबूचे पीक स्वीकारले. आज सिंधुदुर्ग मधले बांबू उत्पादक शेतकरी स्वयंपूर्ण झाले आहेत हाच पॅटर्न समान भौगोलिक परिस्थिती असलेल्या पालघर मध्ये देखील यशस्वी होऊ शकतो असे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
पालघरच्या उपजिल्हाधिकारी (मनरेगा) विजया जाधव यांनी बांबू लागवडीसाठी पालघर जिल्ह्यातल्या सर्व यंत्रणा समन्वयाने काम करत आहेत असे सांगत येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांचे अर्ज जमा करून घेतले जातील त्यावर तातडीने प्रक्रिया करून पहिल्या वर्षात 80 टक्के रोपं जगवण्याचा आमचा प्रयत्न असेल. रोजगार हमी योजनेतून शेततळ्याच्या योजने साठी आम्ही काही बदल सुचवले आहेत त्यानुसार बदल केल्यास बांबू लागवडीचे स्वतंत्र अनुदान आणि शेततळ्याचे स्वतंत्र अनुदान अशा पद्धतीने शेतकऱ्यांना लाभ देणे शक्य होईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.