
Top Marathi News Today Live : राज्यातील 226 नगरपरिषदांसह 38 नगरपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात
02 Dec 2025 09:20 AM (IST)
बीड : नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड शहरातून पैसे वाटपाचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पेठ बीड भागात दोन तरुण पैसे वाटताना आढळून आले असून रात्रीच त्यांना काही युवकांनी पकडल्याचा दावा केला जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मतदानाच्या आदल्या रात्री दोन तरुण दुचाकीवरून फिरत पैसे वाटत असल्याची माहिती मिळताच सोनार गल्ली भागातील काही तरुणांनी त्यांना थांबवले. तपासणीदरम्यान स्कुटीच्या डिक्कीत रोकड आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हाचे पोस्टर आढळून आल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
02 Dec 2025 09:19 AM (IST)
India Share Market Update: जागतिक बाजारातील मिश्र संकेतांमुळे मंगळवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सपाट पातळीवर उघडण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची सुरुवात मंदावल्याचे दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २६,३२९ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ६ अंकांनी कमी होता.
02 Dec 2025 09:09 AM (IST)
स्वराज्यरक्षक संभाजी फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आता लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. अभिनेत्रीने मालिकेमध्ये महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारली होती. आता तिला खऱ्या आयुष्यात देखील तिचा शंभूराज मिळाला आहे. अभिनेत्री याआधी तिच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली, आता अभिनेत्रीच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे. नुकतेच तिने तिच्या संगीत कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत ज्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे.
02 Dec 2025 08:55 AM (IST)
राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी आज मतदान होत असताना चंद्रपूरमध्ये पैसे वाटप केल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये काही व्यक्तींना ५०० रुपयांच्या नोटा वाटल्या जात असल्याचे स्पष्ट दिसत असून, हा प्रकार भाजपच्या उमेदवाराकडून केला गेल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. व्हिडिओ चंद्रपूरमधील राजुरा परिसरातील असल्याची माहिती असून तो झपाट्याने सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे पैशांचे वाटप हे उमेदवाराच्या घराजवळच होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
02 Dec 2025 08:52 AM (IST)
गोंदिया, तिरोडा नगरपरिषद व सालेकसा, गोरेगाव नगरपंचायतच्या एकूण 98 जागांसाठी आज एकूण 209 मतदान केंद्रांवरून मतदान पार पडणार आहे. या चारही ठिकाणाचे एकूण 1 लाख 65 हजार 881 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
02 Dec 2025 08:50 AM (IST)
नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार निलेश राणे आणि भाजप यांच्यातील सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मालवणमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री नाट्यमय घडामोडी घडल्या. मध्यरात्री पोलिसांच्या विशेष पथकाने नाकाबंदी दरम्यान एका कारला अडवून तपासणी केली. ही कार भाजपचे देवगड तालुका अध्यक्ष महेश नारकर यांच्या मालकीची असल्याची माहिती मिळाली.
02 Dec 2025 08:45 AM (IST)
मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावणे आवश्यक आहे. मालवण नगरपरिषद निवडणुकीत लग्न सोहळा असताना वधूने मतदानाचा हक्क बजावल्याचे पाहायला मिळाले. मालवण भंडारी स्कूल येथे दोन वधूंनी मतदान केले.
02 Dec 2025 08:42 AM (IST)
सांगली जिल्ह्यातील 6 नगरपरिषद आणि 2 नगरपंचायतीची मतदानाला सुरुवात झाली. नगरपरिषद आणि नगरपंचायत मिळून यामध्ये नगराध्यक्षपदाच्या आठ जागांसाठी ४१ उमेदवार, तर १८१ नगरसेवक पदांसाठी ५९४ उमेदवार रिंगणात आहेत.
02 Dec 2025 08:37 AM (IST)
रत्नागिरी जिल्ह्यातील चार नगरपरिषद आणि तीन नगरपंचायतींसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. राजापूर, रत्नागिरी, चिपळूण आणि खेड नगरपरिषदेसाठी तर देवरूख, गुहागर आणि लांजा नगरपंचायतीसाठी मतदान होत असून मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
सात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगराध्यक्षपदासाठी एकूण ४३ उमेदवार रिंगणात आहेत. तर नगरसेवकांच्या १५१ जागांसाठी तब्बल ४५३ उमेदवार मैदानात असून चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.या सात संस्थांसाठी जिल्ह्यात २०० मतदान केंद्रे निर्माण करण्यात आली असून सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत, आमदार शेखर निकम तसेच उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. खेड नगरपरिषद, राजापूर आणि देवरूख नगरपंचायतीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगला असून निकाल कोणाच्या बाजूने झुकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
02 Dec 2025 08:32 AM (IST)
रत्नागिरीत लग्नाच्या आधी नवरदेव मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचला आहे. राहुल शिवलकर असं या नवरदेवाचे नाव आहे. लग्नाआधी उपस्थिती लावल्याने सगळीकडे एकच चर्चा आहे.
02 Dec 2025 08:32 AM (IST)
गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, आरमोरी आणि देसाईगंज (वडसा) या 3 नगरपालिकांसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. विशेष म्हणजे सुरक्षेच्या कारणास्तव यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये गडचिरोली जिल्ह्यात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदान प्रक्रिया चालायची. मात्र, यंदा राज्यातील इतर ठिकाणाप्रमाणे साडेपाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया चालणार आहे.
02 Dec 2025 08:22 AM (IST)
पुणे जिल्ह्यातील नगरपरिषदांसह नगरपंचायतीसाठी मतदान घेतले जात आहे. तर नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, कोल्हापूरसह इतर अनेक ठिकाणी मतदान घेतले जात आहे.
02 Dec 2025 08:12 AM (IST)
नगराध्यक्षपदासाठी हातकणंगलेत सर्वाधिक सात उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आजरा व हुपरीमध्ये सहा, जयसिंगपूरमध्ये पाच, शिरोळमध्ये चार, कुरुंदवाड, कागल, गडहिंग्लज, चंदगडमध्ये प्रत्येकी तीन उमेदवार एकमेकांविरोधात उभे आहेत. पेठवडगाव, मलकापूर, पन्हाळा, मूरगूड या नगरपालिकांमध्ये सरळ सामना होत आहे.
02 Dec 2025 08:02 AM (IST)
राज्यातील अनेक नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होत आहे. त्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोमवारी (दि.१) सर्व तिसरे प्रशिक्षण देऊन त्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदान केंद्रावर मतदारांना मोबाईल नेता येणार नाही. केवळ मतदान केंद्राध्यक्ष व तेथील अधिकाऱ्यांना कामकाजासाठी मोबाईल वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
02 Dec 2025 07:52 AM (IST)
तीर्थक्षेत्र जेजुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया व मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शीतल मुळे, सहाय्यक निवडणूक आधिकारी चेतन मुळे यांनी दिली. जेजुरी नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदारांची संख्या ही १५ हजार ८०० असून यात महिला मतदारांची संख्या ८२१५ तर पुरुष मतदार संख्या ७५८३ व इतर मतदार २ आहेत. पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे.
Marathi Breaking Live Updates : राज्यातील 226 नगर परिषदांसह 38 नगरपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. प्रशासनाकडूनही विशेष तयारी केली गेली आहे. त्यात नगरपरिषदांसह नगरपंचायतीसाठी मतदान होत आहे. अत्यंत अटीतटीची आणि राजकीय प्रतिष्ठा पणाला लावून अनेकजण राजकीय मैदानात उतरले आहेत. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मतदानाला सकाळी साडे सात वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठीचे मतदान सायंकाळी साडेपाचपर्यंत असणार आहे. तर याची मतमोजणी उद्या (दि.3) केली जाणार आहे. यातच कोल्हापूर जिल्ह्यातील १३ नगरपालिका, नगरपंचायतीसाठी मतदान होत आहे. राज्यातील सर्वच ठिकाणी नेत्यांनी आपली राजकीय ताकद पणास लावल्याने ऐन थंडीत वातावरण तापले आहे. बुधवारी (दि. ३) मतमोजणी होणार आहे.
सर्वच नगरपालिका व नगरपंचायतींसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. सोमवारी दुपारनंतर मतदानासाठी लागणारे साहित्य संबंधित तहसीलदारांच्या नियंत्रणाखाली प्रत्येक केंद्रावर रवाना करण्यात आले आहे.